लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरातील एका इमारतीत ५४ वर्षीय महिलेसह तिच्या २२ वर्षीय मुलाचा मृतदेह रविवारी त्यांच्या घरात आढळून आला आहे. याबाबत विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.




उमा तावडे (वय ५४) आणि अभिषेक तावडे (वय २२) अशी या मृत व्यक्तींची नावे आहेत. अभिषेकचे वडील रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरी आले. यावेळी पत्नी हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत होती. मुलगा बेडरूममध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला. त्यांनी तत्काळ ही माहिती विक्रोळी पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोघांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा-मुंबई: दोनशे रुपये मिळवण्याच्या प्रयत्नात साडेसहा लाख रुपये गमावले
अभिषेक हा काही वर्षांपासून मानसिक तणावाखाली होता. याच तणावातून त्याने ही आईची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र पोलिसांनी वडील संजय तावडे यांचा जवाब नोंदवला असता, त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.