मुंबई: राज्याचा कारभार ज्या इमारतीतून हाकला जातो ती नरिमन पॉईंट परिसरातील मादाम कामा मार्गावरील सात मजली इमारत म्हणजे आपले मंत्रालय. मुख्यमंत्री, सर्व मंत्री मुख्य सचिव आणि सचिव याच इमारतीतून राज्याचा कारभार पाहतात. या मंत्रालयात दिवसाला पाच ते सहा हजार नागरिक भेट देतात. सात हजार तर कर्मचारी आणि अधिकारी आहेत. या मंत्रालयात गेली दोन दिवस एका मेलेल्या मांजरीचा चर्चा सुरू आहे. तसे तर मंत्रालय परिसरात उंदीर, घुशी, मांजरी भटकी कुत्री पदोपदी बघायला मिळतात. कुत्री मांजरी तर पोलिस आणि कर्मचाऱ्यांनी पाळली आहेत. परदेशातील एखादे शिष्टमंडळ मंत्रालयात आले तर त्यांना ह्या भटकी कुत्री मांजरी यांचे हमखास दर्शन होते तर गेली दोन असे झाले.

मंत्रालयाला पाणी पुरवठा करणाऱ्या उच्च आणि भूमिगत जलकुंभात मेलेले मांजर पडल्याने मंत्रालयाला अशुद्ध पाणी पुरवठा झाला. हे पाणी पिऊन अनेक कर्मचारी, अधिकारी व पत्रकार यांना जुलाब, उलटया असा त्रास झाल्याचा संदेश गेली तीन दिवस समाज माध्यमांवर फिरत आहे. अशा प्रकारे या संदेशात कोणतेही तथ्य नाही, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना करावा लागला. या संदेशामुळे गेली तीन दिवस मंत्रालयात मात्र मेलेल्या मांजरीची चर्चा सुरु होती.

मुंबईचे तापमान ४० डिग्री सेल्सीअंशच्या पार गेले आहे. बाहेर कडाक्याचे उन्ह पडत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरु झाले असल्याचे डाॅक्टर सांगत आहेत. अशा वातावरणात मंत्रालयाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभ (टाक्या) आणि भूमिगत जलकुंभ यात मेलेेले मांजर पडल्याने संपूर्ण मंत्रालयाला अशुद्ध पाणी पुरवठा झाला आहे. या अशुद्ध पाणी पुरवठयामुळे अनेकांना पोटाचा त्रास सुरु झाला आहे. उलट्या, जुलाब होत असल्याच्या तक्रारी काही कर्मचारी व पत्रकारांनी केलेल्या आहेत. असा संदेश गेली दोन दिवस समाजमाध्यमांवर फिरत आहे.

मंत्रालयातील पाणी प्यायल्याने हा त्रास झाल्याची कोणतीही लेखी तक्रार नाही पण मंत्रालयातील अशुद्ध पाणी प्यायल्याने हा त्रास झाल्याची चर्चा समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक कार्यकारी अभियत्यांना या संदेशावर खुलासा करावा लागला. मंत्रालयातील जलकुंभ वेळच्या वेळी स्वच्छ केले जातात. मुंबई पालिकेच्या सूचनेवरुन त्यावर लोखंडी जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत. या जलकुंभात मांजर पडू शकत नाही आणि पडलेले नाही, अशा शब्दात ही सार्वजनिक बांधकाम विभागाने हे वृत्त फेटाळले पण या निमित्ताने दोन दिवस मंत्रालयात मेलेल्या मांजरीची चर्चा जोरात सुरु होती.