मुंबई : आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) पंच असलेले प्रभाकर साईल (३७) यांचा चेंबूर येथील निवासस्थानी मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे शुक्रवारी साईलचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली. आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरूख खानकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये एसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप साईलनी केला होता. साईल यांच्या मृत्यूप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

 साईल माहूल परिसरात राहत होते. प्रथमदर्शनी साईल यांचा मृत्यू नैसर्गिक वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रभाकर साईल यांच्या आई मुंबईतील अंधेरी परिसरात राहतात.  साईलनी प्रतिज्ञापत्राद्वारे अनेक धक्कादायक खुलासे केले होते. प्रभाकर यांच्या दाव्यानुसार, या प्रकणातील दुसरे पंच के पी गोसावी आणि सॅम डिसूझाचे आपण दूरध्वनीवरील संभाषण ऐकले होते. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत व्यवहार अंतिम करू. त्यातील आठ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा प्रभाकर यांनी दावा केला होता. आपण के पी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही प्रभाकर यांनी केला होता. आरोपानुसार, क्रुझवर छापेमारी झाल्यानंतर शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि के पी गोसावी तसेच सॅमला निळय़ा रंगाच्या मर्सिडिजमध्ये पाहिले होते. या तिघांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली होती, असेही त्यांनी सांगितले होते. या वेळी साईल यांनी आपल्या कुटुंबाला धोका असल्याची भीतीही व्यक्त केली होती.