scorecardresearch

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी; संशयिताला बोरिवली परिसरातून अटक

भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांना व त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी; संशयिताला बोरिवली परिसरातून अटक
उद्योजक मुकेश अंबानी व निता अंबानी (संग्रहित फोटो)

भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांना व त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपीनं सोमवारी सकाळी रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर धमकीचा फोन केला होता. त्यानं फोनवरून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत डी. बी. मार्ग पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

विष्णू विधू भोमीक असं अटक केलेल्या ५६ वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याला डी बी मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. त्याची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे, याबाबतची माहिती झोन २ चे डीसीपी निलोत्पल यांनी माध्यमांना दिली आहे. आरोपी विष्णू याला पोलिसांनी बोरिवली पश्चिम परिसरातून अटक केली आहे.

हेही वाचा- “हात नाही तोडता आला तर…” चितावणीखोर भाषणानंतर बंडखोर आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात गुन्हा दाखल

नेमकं प्रकरण काय आहे?
सोमवारी सकाळी ७-८ च्या सुमारास रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकारानंतर रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या धमकीच्या फोनबाबत तात्काळ माहिती दिली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन डी बी मार्ग पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून घटनेचा तपास सुरू केला.

हेही वाचा- बंडखोर आमदार संतोष बांगर यांना संताप अनावर; व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली, VIDEO व्हायरल

तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करत अवघ्या काही तासांत संशयित आरोपीला बोरिवली पश्चिम परिसरातून अटक केली आहे. संबंधित आरोपीला डी बी मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या