scorecardresearch

मुंबईत मृतांच्या संख्येत वाढ

मुंबईत आठवडय़ाभरात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत निम्म्याहून अधिक घट झाली असली तरी मृतांची संख्या मात्र जवळपास ७५ टक्क्यांनी वाढली आहे.

जोखमीच्या गटातील व्यक्तींवर विशेष लक्ष देणे गरजेचे

शैलजा तिवले

मुंबई : मुंबईत आठवडय़ाभरात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत निम्म्याहून अधिक घट झाली असली तरी मृतांची संख्या मात्र जवळपास ७५ टक्क्यांनी वाढली आहे. मृतांमध्ये बहुतांश ६० वर्षांवरील रुग्णांचा समावेश असून ते दीर्घकालीन आजारांनी बाधित होते. त्यामुळे जोखमीच्या गटातील व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे. करोनाची तिसरी, त्यातच ओमायक्रॉन या उत्परिवर्तित प्रकाराचा धोका यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या वेगाने वाढत गेली. मागील दोन आठवडय़ांपासून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.

२७ डिसेंबर ते २ जानेवारी या आठवडय़ात शहरात केवळ सात रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णसंख्या वाढत गेली तशी हळूहळू मृतांची संख्याही वाढत गेली. ३ ते ९ जानेवारी या आठवडय़ात मृतांच्या संख्येत जवळपास चौपटीहून अधिक वाढ होऊन त्यांची संख्या २९ च्या वर गेली. गेल्या आठवडय़ापासून मुंबईतील रुग्णसंख्येचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख २० हजारांहून थेट आठ हजारांपर्यंत खाली आला आहे. परंतु मृतांच्या संख्येत मात्र वाढ कायम राहिली आहे. १० ते १६ जानेवारी या काळात मृतांची संख्या थेट ५१ वर गेली आहे. लाट सुरू झाल्यानंतर साधारण दोन ते तीन आठवडय़ांनी मृतांची संख्या वाढते, असा पूर्वीच्या लाटांमधील अनुभव आहे. संसर्गप्रसार वाढल्यावर ६० वर्षांवरील नागरिक, प्रतिकारशक्ती क्षीण असलेले रुग्ण यांमध्ये बाधितांचे प्रमाण वाढते आणि मृतांची संख्या वाढायला सुरुवात होते. तिसऱ्या लाटेमध्येही आता जवळपास दोन ते तीन आठवडय़ांनी मृतांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. परंतु बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण फार कमी असल्याने चिंतेचे कारण नाही. आणखी एक आठवडा हे प्रमाण वाढत राहील आणि त्यानंतर मात्र हळूहळू कमी होईल, असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

रुग्णांचे वर्गीकरण होणे गरजेचे

गेल्या काही दिवसांमध्ये बहुतांश ६० वर्षांवरील किंवा दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यांच्यामध्ये डेल्टाची लक्षणे प्रामुख्याने होती. त्यामुळे ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी काही प्रमाणात डेल्टाचा धोकाही अजून आहे. प्रत्येक जीव आपल्यासाठी महत्त्वाचा असल्यामुळे रुग्णांचे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी चाचण्या अधिकाधिक वाढवून बाधितांचे निदान होणे आणि यातील गंभीर लक्षणे असलेल्या, जोखमीच्या गटातील व्यक्तींकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु ओमायक्रॉनचे स्वरुप सौम्य असल्याच्या समजामुळे अनेकजण चाचणी करण्याचे टाळत आहेत. तसेच लक्षणे सौम्य असली तरी डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे. त्यामुळे जोखमीच्या गटातील व्यक्तींनी सावधगिरी बाळगायला हवी, असे डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Death toll rises corona patients infection ysh

ताज्या बातम्या