मुंबई : मुंबई- पुणे प्रवासाची ओळख असलेली मध्य रेल्वेची प्रतिष्ठित ‘डेक्कन क्वीन’ एक्स्प्रेसने १ जून रोजी सेवेच्या ९७ व्या वर्षात पदार्पण केले. तब्बल ९६ वर्षांची अखंड आणि गौरवशाली सेवा पूर्ण करणाऱ्या या ऐतिहासिक रेल्वेगाडीचा ९६वा वर्धापन दिन मुंबई आणि पुणे येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावरून दख्खनच्या राणीचे आजही प्रवाशांच्या मनावर अधिराज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
तत्कालीन ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (जीआयपीआर) तर्फे मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी १ जून १९३० रोजी ‘डेक्कन क्वीन’ची सुरुवात करण्यात आली होती. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील ही पहिली डिलक्स ट्रेन ठरली. दख्खन प्रदेशाला जोडणारी आणि त्या काळातील आधुनिक सुविधांनी सजलेली ही गाडी पुढे ”दख्खनची राणी” म्हणून देशभर प्रसिद्ध झाली.
पुणे आणि सीएसएमटी येथे जल्लोषात उत्सव
दख्खनच्या राणीने ९७ व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने पुणे स्थानकावर सकाळी गाडी क्रमांक १२१२४ पुणे ते सीएसएसटी डेक्कन क्वीनच्या प्रस्थानावेळी; तसेच सायंकाळी गाडी क्रमांक १२१२३ सीएसएमटी ते पुणे डेक्कन क्वीनच्या प्रस्थानावेळी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक फुलांच्या सजावटीने सजलेल्या ट्रेनमध्ये प्रवासी, रेल्वे अधिकारी आणि रेल्वेप्रेमींच्या उपस्थितीत केक कापून हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात आला.
डेक्कन क्वीनला आधुनिकतेची जोड
यावर्षी डेक्कन क्वीनमध्ये प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले आहे. वारसास्थळाचा ऐतिहासिक ठेवा जपून डायनिंग कारचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. तसेच, आधुनिक फर्निचर आणि आकर्षक अंतर्गत सजावटीमुळे प्रवाशांचा भोजन अनुभव अधिक समृद्ध झाला आहे. याशिवाय शौचालयांचे आधुनिकीकरण, विनाइल फ्लोअरिंग, ड्युरो-वाइप मॅट, साबण व टिश्यू डिस्पेंसर यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. कोचच्या आतील भाग, छत आणि पॅनल बोर्ड नव्या आकर्षक थीममध्ये पुनर्रचित करण्यात आले आहेत.
‘ट्रेन महोत्सवा’तून इतिहास उजाळला
सीएसएमटी येथे २७ मार्च २०२६ रोजी आयोजित ‘ट्रेन महोत्सवा’त डेक्कन क्वीनच्या १९३० पासूनच्या प्रवासावर आधारित विशेष ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण करण्यात आले. रेल्वे अधिकारी, प्रवासी, रेल्वेप्रेमी आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावली.
डेक्कन क्वीनचा ऐतिहासिक प्रवास
सुरुवातीला सात-सात डब्यांचे दोन रेक असलेल्या या गाडीचे कोच इंग्लंडमध्ये तयार करण्यात आले होते, तर कोच बॉडी माटुंगा वर्कशॉपमध्ये बनवण्यात आली होती. इंटीग्रल कोच फॅक्टरी, पेरंबूर निर्मित आधुनिक स्टील बॉडी कोचचा १९६६ मध्ये समावेश झाला. पुढे डब्यांची संख्या १२ वरून १६ पर्यंत वाढली. पुढे, १९९५ मध्ये एअर-ब्रेक रेक्सचा वापर सुरू झाला, तर १५ ऑगस्ट २०२१ पासून विस्टाडोम कोच गाडीला जोडण्यात आला. त्यामुळे पश्चिम घाटातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद प्रवाशांना घेता येऊ लागला. त्यानंतर, जून २०२२ मध्ये सर्व पारंपरिक डब्यांच्या जागी एलएचबी कोच बसवण्यात आले. एलईडी लाइट्स, बायो-टॉयलेट, ब्रेल संकेतक अशा आधुनिक सुविधा यात उपलब्ध आहेत.
भारतातील एकमेव डायनिंग कार असलेली ट्रेन
डेक्कन क्वीनची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे डायनिंग कार. आजच्या घडीला भारतात डायनिंग कार सुविधा असलेली ही एकमेव ट्रेन आहे. येथे प्रवाशांना टेबल सर्व्हिससह मायक्रोवेव्ह, डीप फ्रीजर, टोस्टर यांसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा उपलब्ध आहेत.
काटेकोर वेळ पालनामुळे विश्वास कायम
गेल्या ९६ वर्षांत डेक्कन क्वीन ही केवळ रेल्वेगाडी न राहता मुंबई-पुणेकरांच्या भावविश्वाचा भाग बनली आहे. वेळेचे काटेकोर पालन, आरामदायी प्रवास आणि सातत्यपूर्ण सेवा यामुळे पिढ्यानपिढ्या प्रवाशांचा या गाडीवर विश्वास कायम राहिला आहे. विशेष म्हणजे डेक्कन क्वीनचा वर्धापन दिन आणि ऐतिहासिक पंजाब मेलच्या पहिल्या प्रवासाची तारीख एकच, १ जून असल्याने सीएसएमटी येथे या दोन्ही ऐतिहासिक गाड्यांच्या परंपरेचा गौरव करण्यात आला.
