खंडाळ्याच्या घाटातली निसर्गशोभा दाखवत पुणेकरांना दर सकाळी मुंबईकडे आणणाऱ्या ‘दख्खनच्या राणी’ची शान असलेली डायनिंग कार ‘राणी’च्या ८६व्या वाढदिवशी पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. रेल्वे प्रवासी-ग्राहक सुविधा पंधरवडय़ाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने ही डायनिंग कार पुन्हा सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी डायनिंग कारच्या डब्याचे आयुर्मान संपल्यामुळे गेले तीन-चार महिने ‘दख्खनची राणी’ केवळ पॅण्ट्री कारसह धावत होती. त्याबाबत प्रवाशांनी आणि माध्यमांनी नाराजी व्यक्त करत हे प्रकरण थेट दिल्लीपर्यंत नेले होते. प्रवाशांच्या या रेटय़ामुळेच ही डायनिंग कार पुन्हा एकदा ‘राणी’च्या दरबारात दाखल होणार आहे.
भारतीय रेल्वेवरील मानबिंदू असलेली गाडी म्हणजे पुणे-मुंबई या शहरांदरम्यान धावणारी डेक्कन क्वीन अर्थात दख्खनची राणी! निळ्या-पांढऱ्या रंगसंगतीतील या गाडीसह प्रवाशांचे भावनिक नाते जोडले गेले आहे. या गाडीमधील चाकांवरील उपाहारगृह अर्थात ‘डायनिंग कार’ ही या गाडीची खासियत मानली जाते. खंडाळ्याच्या घाटातून गाडी जाताना गाडीतील उपाहारगृहात बसून गरमागरम कॉफीचा आणि रुचकर पदार्थाचा आस्वाद घेण्याच्या मौजेला प्रवासी गेले चार महिने दुरावले होते. गेली ८५ वर्षे या गाडीचा अविभाज्य घटक असलेल्या या डायनिंग कारच्या डब्याचे आयुर्मान उलटून गेल्याने रेल्वेने हा डबा बाजूला करून त्या जागी साधे रसोईयान जोडले होते. रेल्वेच्या या निर्णयाबाबत डेक्कन क्वीनच्या नेहमीच्या प्रवाशांपासून प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वानी नाराजी व्यक्त केली. नियमित प्रवाशांपैकी काहींनी ‘डायनिंग कार परत आणा’, अशी मोहीमही चालवली होती. रेल्वेने प्रवाशांच्या या मागणीची दखल घेत आता हा डायनिंग कारचा डबा १ जूनपासून म्हणजेच डेक्कन क्वीनच्या ८६व्या वाढदिवसापासून पुन्हा जोडणार असल्याचे स्पष्ट केले.
डेक्कन क्वीनवरील प्रवाशांच्या या प्रेमामुळेच आता एक जुना डबा डायनिंग कारमध्ये बदलण्यात येत आहे. या डब्याचे आयुर्मान पुढील १४ वर्षांचे आहे. यंदा डेक्कन क्वीनला १ जून रोजी ८६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे ‘दख्खनची राणी’ १०० वर्षांची होईपर्यंत तरी हा डबा ‘राणी’च्या दरबारात सेवा देत राहणार आहे.  
– ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद, महाव्यवस्थापक (मध्य रेल्वे)