मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साडेसात लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम  शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत सध्या एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरिता पाच लाख रुपये इतकी कर्जमर्यादा आहे, ती वाढवून आता साडेसात लाख रुपये इतकी करण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्य शासनाच्या भागभांडवलामधून राबविल्या जाणाऱ्या मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेसाठी सध्या असलेली अडीच लाख रुपयांची कर्जमर्यादा वाढवून आता ती पाच लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. यामुळे एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पुरेसे शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार असून त्यांचा शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision give educational loan rs seven and a half lakhs to minority students akp
First published on: 16-02-2022 at 01:45 IST