scorecardresearch

सर्वपक्षीय बैठकीनंतरच भोंग्यांबाबत निर्णय ; गृहमंत्र्यांची भूमिका, मार्गदर्शक सूचना लांबणीवर

भोंगे लावणे किंवा हटविणे ही सरकारची जबाबदारी नाही. पोलिसांची परवानगी घेऊनच ते लावायला हवेत.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वीच निकाल दिला आहे. तरीही, या प्रश्नावर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करणार असून, त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रित केले जाईल़  या बैठकीनंतर भोंग्यांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी दिली.   

भोंगे वापराबाबत दोन दिवसांत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी सोमवारी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.  भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने २००५  मध्ये निकाल दिला होता. त्यानंतर २०१५ आणि २०१७  मध्ये सरकारचे काही आदेश निघाले आहेत. त्यात भोंगे, ध्वनिक्षेपकाच्या परवानगीची पद्धत ठरवून देण्यात आलेली आहे. मात्र, भोंग्यांसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील सर्व प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावून याबाबत चर्चा करणार आहे. राज ठाकरेंनाही या बैठकीला बोलावणार आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.   

भोंगे लावणे किंवा हटविणे ही सरकारची जबाबदारी नाही. पोलिसांची परवानगी घेऊनच ते लावायला हवेत. ज्यांना तशी परवानगी नाही, त्यांना भोंगे लावता येणार नाहीत, असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. भोंग्यांबाबत पोलीस महासंचालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल दिला आहे, असेही त्यांनी सांगितल़े

कठोर कारवाईची सूचना

गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वळसे पाटील यांनी केल़े  संघर्ष वाढविण्याचा किंवा तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मशिदीत सीसीटीव्ही आहेत कामनसेचा सवाल

मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता मशिदीत सीसीटीव्ही का बसविले जात नाहीत, असा सवाल उपस्थित करीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. मशिदीत सीसीटीव्हीबाबत राज्य सरकारने नियमावली आखून, त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. जवळपास सगळय़ा मंदिरांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. परंतु, मशिदीत सीसीटीव्ही आहेत का? सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांत सीसीटीव्ही यंत्रणा सक्तीची का करू नये, हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. सरकारने याबाबत नियमावली तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राष्ट्रीय धोरण ठरवा

प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण तयार करुन त्याची अंमलबजावणी बिहार, दिल्ली, गुजरातपासून सुरू करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. भोंग्यांच्या वादामुळे हिंदूत्व बदनाम होत असून, या वादामागे भाजपचाच हात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. मुस्लिम धर्मीयांसंदर्भातील प्रश्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चर्चेद्वारेच सोडविल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Decision on loudspeakars only after all party meeting says maharashtra hm dilip walse patil zws

ताज्या बातम्या