रेल्वेप्रवासाबाबत लवकरच निर्णय

उपनगरी रेल्वेतून प्रवासाची कधी परवानगी मिळणार असा सवाल केला जातो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सूतोवाच, व्यापाऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन

मुंबई : मुंबईतील उपनगरी रेल्वेतून प्रवासाला परवानगी नसल्याने लोकांमध्ये असंतोष वाढत असतानाच उपनगरी रेल्वे प्रवासाला परवानगी  देण्याबाबत जबाबदारीचे भान ठेवून निर्णय घेणार असून लवकरच त्याबाबत राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्याचे संके त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. तसेच आंदोलनाचा पवित्रा घेणाऱ्या व्यापाऱ्यांनाही संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिाम’ विभागाच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. राज्य सरकारने दुकानांच्या वेळा, कार्यालयांतील उपस्थिती याबाबत निर्बंध शिथील के ले. पण कर्मचाऱ्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासाची परवानगी नसल्याने नाराजी वाढत आहे. विरोधी पक्षांनीही लोकांमधील असंतोष संघटित करण्यासाठी त्यावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. तशात गुरुवारी सकाळी उच्च न्यायालयानेही उपनगरी रेल्वेतून प्रवास बंदी व लांब पल्ल्याच्या गाड्या, बसमधून होणारी गर्दी या विसंगतीवर बोट ठेवत महाविकास आघाडी सरकारचे कान टोचले. या पार्श्वभूमीवर उपनगरी रेल्वेतून प्रवासाबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्याचे संके त उद्धव ठाकरे यांनी दिले.

उपनगरी रेल्वेतून प्रवासाची कधी परवानगी मिळणार असा सवाल केला जातो. त्याबाबतही विचार सुरू आहे. ज्या पद्धतीने आपण दुकानांना शिथिलता दिली. त्याचप्रमाणे उपनगरी रेल्वे प्रवासाच्या परवानगीचा निर्णयही जबाबदारीचे भान ठेवूनच घेणार आहोत. त्यासंदर्भात मी लवकरच तुमच्याशी संवाद साधेन, असे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई आणि महाराष्ट्रात करोनाची परिस्थिती संमिश्र स्वरूपाची आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे.

तर काही ठिकाणी चिंताजनक नसली तरी चिंता करावी लागू नये याची खबरदारी घेण्यासारखी आहे. जिथे  शिथिलता देऊ शकतो तिथे दिली आहे. जिथे देऊ शकलो नाही, तिथे नाईलाज आहे. पण याचा अर्थ हे बंद म्हणजे कायमच बंदच असा अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  नियम तोडू नका व संयम सोडू  नका, असे आवाहन निर्बंध शिथिल न झालेल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी के ले. कुणी आमचे शत्रू आहेत आणि कुणी आमचे लाडके आहेत असे काहीही नाही. सगळ्या नागरिकांच्या जिवाची काळजी घेऊनच निर्णय घ्यावे लागतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

‘बीजिंग महापालिकेत तर शिवसेनेची सत्ता नाही’

मुंबईतील पूरस्थितीला महापालिके तील सत्ताधारी शिवसेना जबाबदार असल्याच्या भाजप नेत्यांच्या टीके चाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. मुंबईवर नैसर्गिक आपत्ती येतच आहेत. सध्या एक नवीन संकट आहे. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस काही तासांत पडत आहे.  पूरस्थिती के वळ मुंबईतच नव्हे तर जगभर निर्माण होत आहे. बीजिंग किंवा जगभरात ज्या शहरांत पूर तेथील महापालिका काही शिवसेनेच्या ताब्यात नाही. पण तिथेही पूर आले. आता त्याला जबाबदार कोण? हे तिथे कोण असतील ते बोलत असतील,’ असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Decision on railway travel soon chief minister uddhav thackeray appeal to traders to exercise restraint akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या