मुंबई : मुंबईत शुक्रवारी करोना रुग्णसंख्या एक हजारपेक्षा कमी होती. त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील रुग्णसंख्येतही मोठी घट झाली. राज्यात शुक्रवारी ३ हजार २४९ रुग्ण नवे रुग्ण आढळले. तर ४ हजार १८९ करोनामुक्त झाले. मुंबईत करोना संसर्ग कमी होण्यास सुरुवात झाली असून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेखही खाली जात आहे. पुढील १५ दिवसांत रुग्णसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात सध्या २३ हजार ९९६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत दोन करोनाबाधितांचा मृत्यू

मुंबईत करोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असून शुक्रवारी दिवसभरात ९७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या ११ लाख १३ हजार ४७० झाली आहे. तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दोन करोनाबाधितांपैकी एक ७२ वर्षीय पुरुष असून दुसरी ९ वर्षांची मुलगी होती. दोघांनाही दीर्घकालीन आजार होते.  मुंबईत करोनामृतांची संख्या १९ हजार ६१२ झाली. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात एक हजार ८९६ रुग्णांनी करोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ८४ हजार १४८ रुग्ण करोनामुक्त झाले.  मुंबईत सध्या ९ हजार ७१० सक्रिय रुग्ण आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा दर ५२६ दिवसांवर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्यात ५४६ बाधित

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी ५४६ नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी ठाणे २३९, नवी मुंबई १२९, कल्याण डोंबिवली ६३, मीरा भाईंदर ४३, ठाणे ग्रामीण ४२, उल्हासनगर २०, भिवंडी सहा आणि बदलापूर पालिका क्षेत्रात चार रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ठाणे महापालिका क्षेत्रात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.