मुंबई : राज्यात १० फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. दरवर्षी राज्यभरातील सुमारे १५.५० लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसतात. मात्र मागील तीन वर्षांमध्ये मुंबई विभागातील विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. २०२४ च्या तुलनेमध्ये २०२६ मध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २८ हजार विद्यार्थ्यांची घट झाली आहे. यामध्ये विशेषत: कला व वाणिज्य शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

बारावीच्या परीक्षेला यंदा विभागातून यंदा ३ लाख ५० हजार १५ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून यामध्ये १ लाख ८० हजार ५५४ मुले, तर १ लाख ६९ हजार ४६१ मुलींचा समावेश आहे. मात्र २०२४ पासून बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे.

२०२४ मध्ये बारावीच्या परीक्षेला ३ लाख ७७ हजार ३०० विद्यार्थी बसले होते. यामध्ये मुलींची संख्या १ लाख ७७ हजार ९६८, तर मुलांची संख्या १ लाख ९९ हजार ३२९ इतकी आहे. तर २०२५ मध्ये ३ लाख ६३ हजार ३७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये मुलांची संख्या १ लाख ८९ हजार ९०० आणि मुलींची संख्या १ लाख ७३ हजार ४६९ इतकी होती. यावरून २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये विद्यार्थ्यांची संख्या १३ हजार ९२८ ने कमी झाली आहे, तर २०२५ च्या तुलनेत २०२६ मधील विद्यार्थी संख्या १३ हजार ३५७ ने घटल्याचे निदर्शनास आले. कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

२०२६ मध्ये कला शाखेतून ४६ हजार २६, वाणिज्य शाखेतून १ लाख ६८ हजार ८८० आणि विज्ञान शाखेतून १ लाख ३१ हजार ५२२, एमसीव्हीसी २ हजार ६९३ आणि अन्य शाखांतून ३ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर २०२५ मध्ये कला शाखेतून ५० हजार ६९, वाणिज्य शाखेतून १ लाख ७४ हजार ४३० आणि विज्ञान शाखेतून १ लाख ३४ हजार ७८९, एमसीव्हीसी ३ हजार १५३ आणि अन्य शाखांतून ९३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २०२४ मध्ये कला शाखेतून ५१ हजार ९७४, वाणिज्य शाखेतून १ लाख ८५ हजार ३६० आणि विज्ञान शाखेतून १ लाख ३५ हजार ४४८, एमसीव्हीसी ३ हजार ६१९ आणि अन्य शाखांतून ८९९विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.