मुंबई : नैसर्गिक, सेंद्रीय शेतीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. तरीही नैसर्गिक, सेंद्रीय शेतीच्या क्षेत्रात घट होताना दिसत आहे. राज्यात २०२२-२३ मध्ये १,२८४ हेक्टर क्षेत्र होते, ते २०२४-२५ मध्ये ९६७ हेक्टरपर्यंत खाली आले आहे. परंपरागत कृषी विकास योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन सारख्या विविध योजना राबविल्या जात आहेत. तरीही नैसर्गिक, सेंद्रीय शेतीच्या क्षेत्रात घट होताना दिसत आहे.

राज्यात २०२३ – २४ मध्ये खरीप आणि रब्बी हंगामात एकूण ६४.५७ लाख टन रासायनिक खतांची वापर केला होता. २०२५-२६ मध्ये एकूण ७६.८३ लाख टन खतांचा वापर होण्याचा अंदाज आहे. त्यात खरिपात ४५.३३ लाख टन आणि रब्बीतील ३१.५० लाख टन खतांचा समावेश आहे. कीडनाशकांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. राज्यात २०२३-२४ मध्ये खरीप आणि रब्बी हंगामात एकूण ८,७१८ टन कीडनाशकांचा वापर करण्यात आला होता, २०२५-२६ मध्ये तो १०,१०४ टनांवर जाण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे प्रचार – प्रसिद्धीनंतरही जैविक कीडनाशकांचा वापर कमी होताना दिसत आहे. २०२३-२४ मध्ये २,६११ टन जैविक कीडनाशकांचा वापर झाला होता, चालू आर्थिक वर्षात फक्त १२१८ टन जैविक कीडनाशकांचा वापर होण्याचा अंदाज आहे.

सिंचन क्षमतेत किरकोळ वाढराज्य सरकारचा सिंचन प्रकल्प, नदीजोड प्रकल्पांवर भर असला तरीही सिंचन क्षमतेत फारशी वाढ झालेली दिसत नाही. ३० जून २०२३ पर्यंत एकूण सिंचन क्षमता ५६.३३ लाख हेक्टर होती, तर २०२२-२४ मधील एकूण सिंचन क्षेत्र ३९.२७ लाख हेक्टर होते. त्या तुलनेत ३० जून २०२४ पर्यंत एकूण सिंचन क्षमता ५७.१६ लाख हेक्टर होती, तर २०२४-२५ मधील एकूण सिंचन क्षेत्र ४०.५५ लाख हेक्टर इतके होते. राज्याच्या सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात किरकोळ वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

दूध उत्पादन वाढले

गतवर्षी राज्यात १६०.४५ लाख टन दूध उत्पादन झाले होते. २०२४-२५ मध्ये १६६.२६ लाख टन दूध उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मार्च २०२५ अखेर सहकार क्षेत्रात प्रतिदिन ८३.२५ लाख लिटर दुग्ध प्रक्रिया प्रकल्प आणि प्रतिदिन २०.६६ लाख लिटर क्षमतेची ४४ शीतकरण केंद्रे कार्यरत होती. राज्यात दुधाची दरडोई उपलब्धता प्रतिदिन ३५८ ग्रॅम इतकी आहे. पुणे विभाग दूध उत्पादनात आघाडीवर असून, गत आर्थिक वर्षांत ७७.२५ लाख टन दूध उत्पादन झाले आहे. त्याखालोखाल नाशिक विभागात ४४.७१ लाख टन, छत्रपती संभाजीनगर विभागात २४.४५ लाख टन दूध उत्पादन झाले होते.