मुंबई : फलटण येथील महिला डॉक्टराच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा परिणाम सोमवारी रुग्ण सेवेवर फारसा दिसून आला नसला तरी मंगळवारी रुग्णलयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. बाह्यरुग्ण विभागामध्ये सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रुग्णांची संख्या फारच कमी होती.

महाराष्ट्रच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्ड, मॅग्मो, आयएमए, एमएसआरडीए, एएमओ, एमएसएमटीए आणि अस्मि या डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले आहे. फलटणमधील मृत महिला डॉक्टरला न्याय मिळवून दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार डॉक्टरांच्या संघटनांनी केला आहे. आंदोलनाचा सोमवारी रुग्ण सेवेवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र मंगळवारी रुग्णांनी रुग्णालयाकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले. शीव रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये सोमवारी तीन हजार रुग्ण, तर मंगळवारी १ हजार ८४८ रुग्णच उपचारासाठी आले. आपत्कालिन विभागात सोमवारी १९५, तर मंगळवारी २५८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसेच मंगळवारी मोठ्या स्वरुपाच्या २८ शस्त्रक्रिया आणि लघु स्वरुपाच्या ७ अशा ३५ शस्त्रक्रिया झाल्या. सोमवारी ४७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

केईएम रुग्णालयामध्ये सोमवारी बाह्यरुग्ण विभागामध्ये ३ हजार १७३ रुग्ण, तर मंगळवारी २ हजार २७१ रुग्ण उपचारासाठी आले होते. आपत्कालिन विभागामध्ये सोमवारी २३८ रुग्णांवर, तर मंगळवारी २७५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसेच सोमवारी १५४, तर मंगळवारी १०२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये मोठ्या स्वरुपाच्या ५४, तर लघु स्वरुपाच्या ४८ शस्त्रक्रियांचा समावेश होता.

नायर रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये सोमवारी १ हजार ७१० रुग्ण, तर मंगळवारी १ हजार १७ रुग्ण उपचारासाठी आले. सोमवारी आपत्कालिन विभागामध्ये ६९ रुग्णांवर, तर मंगळवारी ४९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. सोमवारी ५२, तर मंगळवारी ३९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याचप्रमाणे नायर दंत रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभागामध्ये सोमवारी ५८९ रुग्णांवर, तर मंगळवारी ६४८ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतरही डॉक्टर निर्णयावर ठाम

केंद्रीय मार्डने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुश्रीफ यांनी निवासी डॉक्टरांचे विषय, मागण्या आणि मांडलेले मुद्दे लक्षपूर्वक ऐकले. आंदोलनामुळे रुग्ण सेवेत व्यत्यय येऊ नये यासाठी त्यांनी सध्या सुरू असलेला संप मागे घ्यावा. तसेच राज्य शासन या मागण्यांवर गांभीर्याने चर्चा करीत असून तातडीने पुढील पावले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत ‘मार्ड’च्या मागण्यांवर लवकरच चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शासनाकडून अधिकृत लिखित आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर केंद्रीय मार्डच्या प्रतिनिधींनी ठाम आहेत.