मुंबई : केंद्रीय दूरसंचार विभागाच्या महत्त्वाच्या सेवेमध्ये मोडणाऱ्या महानगर टेलिफोन निगम लि. (एमटीएनएल) आणि भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) या कंपन्यांमध्ये स्वेच्छानिवृत्ती लागू करून त्या पुनरुज्जीवित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र अपुऱ्या कर्मचारीसंख्येमुळे एमटीएनएलच्या सेवेचा दर्जा घसरला असून लँडलाइन सेवेच्या ग्राहकांमध्ये कमालीची घट झाली आहे तर बीएसएनएलच्या सेवेत मात्र वाढ झाली आहे.

भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरणाने मार्च २०२२ अखेरचा अहवाल जारी केला असून त्यातील आकडेवारीवरूनही माहिती उघड झाली आहे. डिसेंबर २०२१ अखेर एमटीएनएलच्या मुंबई व दिल्लीतील लँडलाइन ग्राहकांची संख्या अनुक्रमे १२ लाख ९२ हजार १६ व १४ लाख ६२ हजार ५७३ होती. ती जानेवारी २०२२ अखेर अनुक्रमे १२ लाख ८९ हजार ७१४ आणि १४ लाख ४१ हजार ४०० इतकी झाली आहे. वर्षभरात तब्बल २३ हजार ४७५ ग्राहकांनी ही सेवा बंद केली. एमटीएनएलच्या दिल्ली व मुंबईत स्वेच्छानिवृत्तीमुळे सेवेवर परिणाम झाल्यामुळे कंटाळून ग्राहकांनी सेवा बंद करण्याचे ठरविले असावे, असा अंदाज आहे. बीएसएनलच्या ग्राहकांची संख्या डिसेंबर २०२१ अखेर ७५ लाख ९३ हजार ६४० होती. जानेवारी २०२२ अखेर ती ७६ लाख २५ हजार ७३८ इतकी झाली. याचा अर्थ बीएसएनएलमध्ये कर्मचारी कपात होऊनही त्याचा फटका सेवेला बसला नाही. उलट ३२ हजार ९८ इतके ग्राहक वाढले.

कर्मचारी कपातीमुळे सेवेचा दर्जा घसरल्याचा फटका एमटीएनएलच्या ‘डॉल्फिन’ या मोबाइल सेवेला फारसा बसला नाही, असे या अहवालावरून दिसते. दिल्ली एमटीएनएलची ग्राहक संख्या डिसेंबर २०२१ अखेर २१ लाख ५३ हजार ५७३ इतकी होती. जानेवारी २०२२ अखेर ती २१ लाख ५३ हजार १४२ इतकी झाली. त्याच वेळी मुंबई एमटीएनएलच्या मोबाइल ग्राहकांमध्ये काहीही फरक पडला नाही, असे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र बीएसएनएलच्या मोबाइल ग्राहकांची संख्या तीन लाख ७८ हजार ५७६ इतकी रोडावली. खासगी सेवेतील भारती एअरटेलचे ग्राहक सात लाख १४ हजार १९९ इतके वाढले असताना व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओ यांचे ग्राहक मात्र घटले. व्होडाफोन आयडियाचे तीन लाख ८९ हजार ८२ तर रिलायन्स जिओचे ९३ लाख २२ हजार ५८३ ग्राहकांनी सेवा बंद केली, असे या अहवालावरून दिसून येते.