चाचण्यांची संख्या ३० हजारांखाली; गणेशोत्सवानंतर चाचण्यांचे प्रमाण पालिका वाढवणार

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात गर्दीला उधाण आले असताना पालिकेच्या चाचण्यांच्या संख्येत मात्र घट झाल्याचे आढळले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुमारे ५० हजारांपर्यंत गेलेल्या चाचण्या थेट ३० हजारांखाली आल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये उडालेली झुंबड, निर्बंध शिथिल केल्यामुळे वाढलेला वावर यांमुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे. शहरातील वाढते संक्रमण रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना विभागांना दिल्या. त्यानुसार सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच प्रतिदिन जवळपास ४० ते ५० हजार चाचण्या केल्या जात होत्या. याआधी हे प्रमाण ३५ हजारांच्या खाली होते. बाधित व्यक्तीच्या इमारतीमध्येही तपासणी शिबिरे घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. परंतु गणेशोत्सव सुरू होताच पुन्हा चाचण्यांचा आलेख खाली आला. शनिवारी २९ हजार ८४९ चाचण्या केल्या गेल्या. गणपतीच्या काळात चाचण्या करून घेण्यास नागरिक पुढे येत नाहीत. त्यामुळे  प्रमाण कमी झाले आहे. परंतु विसर्जनानंतर चाचण्याचे प्रमाण पुन्हा नक्की वाढेल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

बाधितांचे प्रमाण एक टक्क्याहून अधिक

ऑगस्टमध्ये शहरातील बाधितांचे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली गेले होते. परंतु निर्बंध शिथिल केल्यावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ापासून पुन्हा ते एक टक्क्याच्या वर गेले. प्रतिदिन नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील दोन दिवसांत काही प्रमाणात घट आढळली असली तरी बाधितांचे प्रमाण एक टक्क्याच्या वरच आहे.

प्रतिजन चाचण्यांमध्ये वाढ

मुंबईत चार दिवसांपूर्वी प्रतिदिन चाचण्यांची संख्या ५० हजारांपर्यंत वाढविली गेली, तेव्हा यात आरटीरपीसीआर चाचण्यांसह प्रतिजन चाचण्यांचे प्रमाणही वाढले आहे. शहरात या काळात २६ ते २७ हजार आरटीपीसीआर तर २२ ते २३ हजार प्रतिजन चाचण्या केल्या गेल्या.

सणासुदीच्या काळात चाचण्या कमी होतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यात रविवारीही चाचण्या कमी झाल्या आहेत. मुंबईतील करोनाचा जोर अजून तरी कमी असल्याचे दिसत आहे. परंतु तरीही पालिकेने गणेशोत्सवाच्या काळात चाचण्यांवर अधिक भर देणे गरजेचे आहे.

– डॉ. राहुल पंडित, सदस्य, करोना कृती दल