लहरी पावसामुळे उत्पादनात घट; पितृपक्षामुळे मागणीत वाढ

पुणे/ठाणे/नवी मुंबई : लहरी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि आता पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्या कडाडल्या आहेत. कांदा-बटाटा आणि कोबी वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर तेजीत आहेत.

काही दिवसांपूर्वी मागणीच्या तुलनेत घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यामुळे सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर घटले होते. शेतक ऱ्यांनी मिळेल त्या दरात भाज्यांची विक्री केली. घाऊक बाजारांमध्ये कवडीमोल दर मिळाल्याने टोमॅटो, ढोबळी मिरची शेतक ऱ्यांनी फेकून दिली.

मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे भाजीपाला लागवडीवर लक्षणीय परिणाम झाला. पुरेशी लागवड न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमी होत आहे, असे किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले.

काही ठिकाणी अतिवृष्टीने उत्पादन खराब झाल्याने आवक घटली. सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू असल्याने भाज्यांना मागणी मात्र वाढली आहे. वाशी येथील ‘एपीएमसी’च्या भाजीपाला बाजारात मंगळवारी आवक कमी झाली. बाजारात रोजच्या सुमारे ६०० गाड्यांऐवजी ४८४ गाड्या भाज्यांची आवक झाली असून, आधी प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी मिळत असलेल्या भाज्या आता २० ते ३० रुपये प्रतिकिलो दर झाला आहे. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळीत दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पयार्य नसल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे.