पावसामुळे भाज्यांची आवक कमी

मुंबई : राज्यभर झालेल्या पावसामुळे मुंबई-ठाण्यातील बाजारांत होणारी आवक कमी झाली असून किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. वाटाण्याचे दर तर घाऊक बाजारातच १२० रुपये किलोवर गेले असून किरकोळ बाजारात दीडशे रुपये किलो दराने वाटाणा विकला जात आहे.

पावसाच्या अनियमिततेमुळे घाऊक बाजारपेठेसह स्थानिक बाजारपेठेतही भाज्यांच्या दराने उसळी घेतली आहे. गेल्या आठवडय़ात ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने मिळणाऱ्या फळभाज्या ६० ते ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे वाटाणा शंभरीपार गेला असून सोमवारी घाऊक बाजारपेठेतच प्रतिकिलो ११० ते १२० रुपये दर होते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये वाटाणा जवळपास १५० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. ‘गेल्या १५ दिवसांमध्ये राज्यात ठिकठिकाणी पाऊ स  झाला, काही ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या  काढणीला आलेल्या भाज्या भिजल्या. भाज्या नाशिवंत असल्याने त्या सडतात आणि आवक कमी होते. त्यामुळेच भाव वाढत असल्याचे वाशी येथील घाऊक व्यापारी विजय चव्हाण यांनी सांगितले,’ तसेच काही भागांमध्ये अद्याप पाऊस झाला नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात अधिक भाववाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

पावसामुळे भाज्यांचा तुटवडा आहे. येणारा मालही भिजून येत असल्याने तो दीर्घकाळ टिकत नाही. चांगल्या प्रतीची गावरान वांगी आणि भेंडी या आठवडय़ात आलीच नाही. वाटाणा तर शंभरच्या पुढे गेला आहे.

– सिद्धार्थ गडदे, भाजी व्यापारी, भायखळा

घाऊक बाजारपेठेततील भाज्यांचे दर

घाऊक बाजारात मेथी, शेपू, माठ या भाज्यांचे दर २५ ते ३५ रुपये जुडीप्रमाणे आहेत. तर कोथिंबीर २० ते २५ रुपये प्रतिजुडी आहे. वाटाण्याचे भाव शंभरीपार असून कोबी आणि फ्लॉवरचे दरही ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. दुधी, काकडी, गाजर, तोंडली, भेंडी या फळभाज्या ६० ते ८० रुपये प्रतिकिलोने उपलब्ध आहेत.