आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडी आणि ठाकरे गटात युती होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून युतीसाठी सकारात्मकता दर्शवण्यात आली आहे. तसेच आज यांसदर्भात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे. ज्यांनी कधी महापरिनिर्वाण दिनाला एखादे बॅनरसुद्धा लावले नाही, त्यांना आता वंचित बहूजन आघाडी बरोबर युती करावी लागते आहे, असं ते म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवरही टीका केली.

हेही वाचा – Maharashtra-Karnataka Border Dispute : “मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखूही शकत नाही, परंतु…”; फडणवीसांच विधान!

काय म्हणाले दीपक केसरकर?

“जे लोकं एखादे बॅनरसुद्धा महापरिनिर्वाण दिनाला लावत नव्हते. त्यांना आता वंचित बहूजन आघाडी बरोबर युती करावी लागते आहे. ही एक चांगली बाब आहे. हिंदुत्त्व सोडल्यानंतर ठाकरे गटाला आता मदतीची गरज आहे. काँग्रसे-राष्ट्रवादी बरोबर यापूर्वीच आघाडी झाली आहे, त्यामुळे आता वंचित बरोबर युती झाली तरी त्यात काही नवल नाही. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेबरोबर जावं का? हा विचार त्यांनी करायला हवा, प्रकाश आंबेडकर याबाबत योग्य तो निर्यय घेतील. शेवटी त्यांना बाबासाहेबांचा वारसा आहे. मतं कुठ मिळतात यापेक्षा हा वारसा महत्त्वाचा आहे”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.

हेही वाचा – “आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे संजय राऊतांना किमान…”; शंभूराज देसाईंनी दिलं प्रत्युत्तर!

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचाही घेतला समाचार

महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकमध्ये येतील तर त्यांच्या कारवाई होईल, असा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता. यासंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “घटनात्मक दृष्ट्या विचार करता, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली, त्याविरोधत केंद्र सरकारकडे तक्रार केली पाहिजे, असं माझं वयक्तीक मतं आहे. त्यांचे मंत्री मुंबईत येतात, बैठका घेतात, महाराष्ट्रात त्यांचं स्वागत होतं, ही आपल्या राज्याची परंपरा आहे. आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्यांना सुद्धा आम्ही चांगली वागणूक देतो. मात्र, त्यांना मुंबईशी नातं तोडायचं असेल, तो त्यांचा निर्णय आहे. त्यांची ही वागणूक घटनात्मक नाही, याबाबत तपास करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. तसेच महाराष्ट्राला कोणी आव्हान देऊ नये, आम्ही आव्हान दिले तर पळता भुई थोडी होईल”, असा इशाराही त्यांनी दिला.

Story img Loader