मुंबई : मुंबई खड्डेमुक्त झाली, चांगले दवाखाने मिळाले, सौंदर्यीकरण होऊन मुंबईकरांचे जीवन बदलले, तर आपले काय होणार, या भीतीने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची आरोपांची आदळआपट सुरू असल्याची टीका शालेय शिक्षण मंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली आहे.
सिमेंटकाँक्रीट रस्त्यांच्या कामात करोडो रुपयांचा गैरव्यवहार असून विशिष्ट कंत्राटदारांना बेकायदेशीरपणे कामे देण्यात आली आहेत. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना कंत्राटे देऊन मुंबई महापालिका लुटत असल्याची टीका ठाकरे यांनी केली होती. त्याला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईकरांना चांगल्या दर्जाचे रस्ते देण्यासाठी स्पर्धात्मक निविदा मागवून देशातील सर्वोत्तम कंपन्यांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे देण्यात आली आहेत. किनारपट्टी रस्त्यासाठी बाजारभावानुसार आणि १२ टक्के अधिक दराने निविदा मंजूर करण्यात आल्या होत्या. आम्ही सध्याच्या रस्त्याच्या कामांपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे रस्ते करण्यासाठी कंत्राटे दिली असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेल्याने ठाकरे गटाने धसका घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर असून अनेक जनसुविधा प्रकल्पांची भूमिपूजने आणि लोकार्पण कार्यक्रम होणार आहेत. आम्ही काहीही केले तरी आदित्य ठाकरे यांना टीका करायची सवयच आहे. कोणी काही चांगले काम करीत असेल, तर त्याची पोटदुखी होण्याचे कारणच नाही, असे केसरकर यांनी मत व्यक्त केले.