मुंबई : मुंबईतील प्रदूषण वाढत असल्यावरून खुद्द अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने समाज माध्यमांवरून चिंता व्यक्त केली. हवेतील प्रदूषणामुळे शहर आणि या शहरातील लहान मुले गुदमरू लागल्याचे तिने समाज माध्यमांवरून म्हटले आहे. तसेच ‘माय बीएमसी हेल्प’ असे म्हणत तिने पालिका प्रशासनाला यावर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मुंबईत हवेचे प्रदूषण झाले असल्याचे महापौर रितू तावडे यांनीही मान्य केले. आम्हाला केवळ दीपिका पदुकोणचीच नाही, तर संपूर्ण मुंबईकरांचीच काळजी आहे, असे महापौर म्हणाल्या.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने चिंता व्यक्त केली आहे. हे शहर आणि लहान मुले गुदमरू लागली आहेत, हे बरोबर आहे का, असा सवाल दीपिकाने केला आहे. या मजकूरात दीपिकाने मुंबई महापालिकेच्या ‘माय बीएमसी’ या अकाउंटला टॅग केले आहे. दीपिकाच्या या मजकूराबाबत प्रसारमाध्यमांनी रितू तावडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनीही मुंबईत प्रदूषण असल्याचे मान्य केले. त्या म्हणाल्या की, मुंबईत दोन हजारांहून अधिक बांधकामे सुरू असून एमएमआरडीए, मेट्रोची पायाभूत कामे सुरू आहेत. या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र तितकीशी अंमलबजावणी होत नसल्याने मुंबईची हवा खालवली असून प्रदूषणात वाढ होत असल्याची कबुली महापौरांनी दिली.

मुंबई महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मुंबईत इमारतींच्या पुनर्विकासाची २२५० बांधकामे, तसेच एमएमआरडीए, मेट्रो अशा विविध प्राधिकरणाची कामे सुरू आहेत. बांधकाम ठिकाणी धुळीचे कण हवेत पसरू नये यासाठी नियमावली जाहीर केली आहे.

बांधकाम ठिकाणी हवेची गुणवत्ता कशी आहे हे माहीत व्हावे यासाठी डिजिटल बोर्ड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. डिजिटल बोर्ड कार्यान्वित केल्याने त्या ठिकाणची हवा कशी आहे त्याची माहिती प्राप्त होते. मात्र अनेक बांधकाम ठिकाणी नियमावलीचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आरोग्याची काळजी महत्त्वाची आहेच, पण तितकीच मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणे याला प्राधान्यक्रम आहे, असे रितू तावडे म्हणाल्या.

मुंबईतील अनेक भागांत गुरुवार, १२ मार्च रोजी हवेचा स्तर बिघडला होता. यावर दीपिकाने थेट समाज माध्यमावरून महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारला. मुंबईत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुंबईचा गुणवत्ता निर्देशांक दाखवत तिने मुंबई महापालिकेकडे मदतीची याचना केली आहे.