मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांना झालेली १५ दिवसांची शिक्षा माझगाव येथील सत्र न्यायालयाने शुक्रवारी स्थगित केली. तसेच, त्यांना जामिनही मंजूर केला.
अब्रुनुकसानीप्रकरणी ठोठावलेल्या शिक्षेला राऊत यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाच्या आदेशाननंतर राऊत हे शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहिले. त्यावेळी, त्यांनी जामिनाची मागणी केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी राऊत यांचे अपील दाखल करून घेताना त्यांना झालेली १५ दिवसांची शिक्षा स्थगित केली. त्याचवेळी, राऊत यांना जामीनही मंजूर केला.
हेही वाचा – मालाडमध्ये नवीन पूल, पालिका करणार १९२ कोटी रुपये खर्च
न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी २६ सप्टेंबर रोजी राऊत यांना मेधा यांची मानहानी केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते व त्यांना १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली होती. त्याचवेळी, राऊत यांना शिक्षेविरोधात अपील दाखल करता यावे यासाठी शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती दिली होती. त्यानुसार, राऊतांनी माझगाव सत्र न्यायालयात शिक्षेला आव्हान दिले होते. त्यावर, गुरुवारी पहिली सुनावणी पार पडली. परंतु, राऊत सुनावणीला अनुपस्थित राहिले. त्यावेळी, कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, असे सुनावताना सत्र न्यायालयाने राऊत यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवताना त्यावेळी उपस्थित राहण्याचे आदेश राऊत यांना दिले होते. त्यानुसार, शुक्रवारी राऊत यांनी न्यायालयात उपस्थिती लावली.