सार्वजनिक उत्सवांमधील वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात पालिका, पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांनी सुरू केलेल्या मोहिमेला अशास्त्रीय ठरविण्याचा ठाण्यातील काही कान-नाक-घसा तज्ज्ञांचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला असून त्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पुण्यातील ‘मांडके हिअरिंग एड’च्या कल्याणी मांडके यांनी डॉ. आशीष भूमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. या वैद्यकीय तज्ज्ञांनी श्रवणक्षमतेविषयी केलेली विधाने अत्यंत दुर्दैवी आणि अवैज्ञानिक असल्याचे स्पष्टपणे नमूद करून तीव्र नाराजी व्यक्त केली. जागतिक आरोग्य संघटनेने ध्वनिप्रदूषणाचे ठरवून दिलेले मापदंड योग्य आहेत. त्यामुळे ९० डेसिबल्स आवाज आपण आठ तास ऐकू शकतो, असे म्हणणे पूर्णत: चुकीचे असून ते त्यांनी मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.  
ध्वनिकंपन लहरींचे मापन डेसिबल्सने केले जाते. उच्च लहरींप्रमाणे लघू लहरीही शरीरास हानीकारक असतात. त्यामुळेच डीजेप्रमाणे पारंपरिक ढोल-ताशांचा आवाजही आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतो. मात्र ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची सर्वसामान्य जनतेला फारशी जाणीव नाही. त्यात वैद्यकीय व्यावसायिकच जर अशा प्रकारे त्याचे समर्थन करीत असतील तर नागरिकांची दिशाभूल होईल. खरे तर ध्वनिवर्धकांचा वापर आता केवळ मोठय़ा समुदायाला भाषण ऐकू जाण्यासाठीच करणे आवश्यक आहे. मोठय़ाने संगीत ऐकण्यासाठी त्याचा अजिबात वापर होऊ नये, असेही मांडके यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
मांडके यांच्याप्रमाणेच १९८४ पासून मुंबईत ध्वनिप्रदूषणाविरोधातील चळवळीत सक्रिय असणाऱ्या डॉ. यशवंत ओक यांनीही नव्वदहून अधिक डेसिबल्स आवाजाचे समर्थन करण्याच्या वृत्तीचा निषेध केला आहे. ध्वनिप्रदूषणामुळे केवळ श्रवणदोषच नव्हे तर हृदयरोग, उच्च रक्तदाब, मानसिक अस्वास्थ, निद्रानाश आदी विकार होतात, असेही त्यांनी म्हटले आहे.