मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया २७ जूनपर्यंत पूर्ण करण्याची सूचना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली होती. मात्र कोणताही विद्यार्थी पदवी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रिया १० जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून एका परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, प्रवेश देऊनही जागा रिक्त राहिल्या असल्यास महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर सामान्य प्रवेश यादी जाहीर करावी आणि प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश द्यावा, अशी स्पष्ट सूचना मुंबई विद्यापीठाकडून महाविद्यालयांना देण्यात आली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या महाविद्यालयाचा संबंधित अभ्यासक्रमांसाठीचा ऑनलाईन अर्जही भरणे अनिवार्य असणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.