scorecardresearch

पंतप्रधान आवास योजनेची संथगती?; राज्यात आतापर्यंत केवळ एक लाख १० हजार २१५ घरे पूर्ण

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वासाठी घरेअसे म्हणत २०२२ पर्यंत ..लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले.

मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वासाठी घरेअसे म्हणत २०२२ पर्यंत ..लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले. मात्र राज्यात या योजनेची अंमलबजावणी संथगतीने सुरू असल्याने हे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १० लाख ३३ हजार ८७४ घरे मंजूर झाली आहेत. मात्र प्रत्यक्षात यातील केवळ एक लाख १० हजार २१५ घरे बांधून पूर्ण झाली आहेत.

केंद्र सरकारने जून २०१५ मध्ये पंतप्रधान आवास योजना आणली. सर्वासाठी घर असे म्हणून २०२२ पर्यंत ही योजना आणली. तर डिसेंबर २०१५ मध्ये राज्य सरकारने राज्यातील ३९० शहरात-गावात ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेत अत्यल्प, अल्प गटाला अनुदान देऊन परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. ही योजना राज्यात राबवण्यासाठी राज्यात २०२२ पर्यंत किती घरांची आवश्यकता आहे याचा आढावाही सरकारने घेतला. त्यानुसार राज्यात १९.४ लाख घरांची गरज असल्याचे समोर आले. त्यामुळे राज्य सरकारने ही मागणी पूर्ण करण्यासाठी योजना हाती घेऊन म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक केली.

 राज्यात गृहनिर्माण करणाऱ्या सर्व सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून या योजनेला सुरुवात केली. म्हाडाने या योजनेला गती देण्यासाठी स्वतंत्र असा पंतप्रधान आवास योजना कक्षही स्थापन केला आहे. या कक्षाच्या आणि इतर सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून योजनेला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोणत्या गटातील किती घरे?

बीएलसी अर्थात लाभार्थ्यांच्या वैयक्तिक घर बांधणी, सुधारणा गटाखाली राज्यात ३ लाख २३ हजार, ८९ घरे मंजूर झाली आहेत. मात्र प्रत्यक्षात यातील केवळ ३२ हजार ९७१ घरांचे काम पूर्ण झाले आहे. एएचपी अर्थात सरकारी यंत्रणा किंवा खासगी विकासकांच्या माध्यमातून भागीदारी तत्त्वावरील घरबांधणीच्या गटाखाली ४ लाख ८६ हजार १६७ घरे मंजूर झाली आहेत. यातील केवळ ३० हजार ७४२ घरे पूर्ण झाली आहेत. आयएसएसआर अर्थात झोपडपट्टीधारकांसाठी खासगी सहभागातून झोपडपट्टी पुनर्विकासांतर्गत २ लाख २४ हजार ६१८ घरे बांधण्यात आली आहेत. यातील ४६ हजार ५५२ घरे पूर्ण झाली आहेत. एकूणच या तीन गटाअंतर्गत आतापर्यंत १० लाख ३३ हजार ८७४ घरे मंजूर झाली आहेत. पण प्रत्यक्षात केवळ १ लाख १० हजार २१५ घरे पूर्ण झाली आहेत. ७ लाख २ हजार घरांचे काम सुरू असून उर्वरित घरांचे काम अद्याप सुरू होणे बाकी आहे. राज्यात १९ लाखांहून अधिक परवडणाऱ्या घरांची गरज आहे.

पंतप्रधान आवास योजनेखाली एफएसआयसारख्या सवलती मिळत असल्याने विकासक प्रकल्प मंजूर करून घेत आहेत. पण प्रत्यक्षात योजना पूर्ण करत नसल्याचे चित्र आहे. या योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी घरे शहरापासून, गावापासून बरीच दूर असून तेथे आवश्यक त्या सुविधाही नाहीत. त्यामुळे ही घरेही विकली जात नसल्याचेही चित्र आहे. जेथे घरांची खरी गरज आहे तेथे घरे बांधली जात नाहीत. त्यामुळे ही योजना रद्द करत गरीबांना घरे देण्यासाठी नवीन लोकाभिमुख योजना आणण्याची गरज आहे.

– चंद्रशेखर प्रभू, ज्येष्ठ वास्तुविशारद

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delay pm housing scheme houses completed state ysh

ताज्या बातम्या