मुंबई : महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत असलेल्या काही अनुदानित तंत्रनिकेतनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन अद्यापही देण्यात आलेले नाही. परिणामी, या सर्वांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि कर्जाचे हप्ते भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या धोरणानुसार वेतन वेळेत देण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सहसंचालक आणि प्राचार्यांना निर्देश देऊनही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन वेळेत अदा होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

अनुदानित तंत्रनिकेतनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात अद्यापही मार्च महिन्याचे वेतन जमा न झाल्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्जाचे हप्ते साधारणपणे दर महिन्याच्या १० तारखेच्या आत कर्ज देणाऱ्या बँक खात्यात जमा करणे अपेक्षित असते. त्यानंतर जमा झाल्यास त्यावर दंड व व्याज (दर महिन्याला एक ते दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक) द्यावे लागते. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक संकटात अडकले आहेत.

हेही वाचा…मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला आव्हान; ओबीसी संघटनेच्या याचिकेवर सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

‘राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत असलेल्या अनुदानित तंत्रनिकेतनातील अध्यापकांचे मार्च महिन्याचे वेतन त्वरित अदा करावे. तसेच त्यांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला देण्याची व्यवस्था करावी. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री व प्रधान सचिवांना पत्र दिले आहे’, असे महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचे (‘मस्ट’) अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी सांगितले. ‘मुंबईतील अनेक तंत्रनिकेतनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन रखडले आहे. सातत्याने वेतन देण्यास विलंब होत आहे. एप्रिल महिन्याचे वेतन खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वैद्यकीय विमा, कर्जाचे हप्ते भरतानाही अडचण निर्माण होत आहेत, असे ’ मुंबईतील तंत्रनिकेतनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.