औषध निर्मातीसाठी लागणारा कच्चा माल ४८ व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेऊन त्याची परस्पर विक्री करून ४५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीतील एका व्यापाऱ्याला नुकतीच अटक केली. या अपहारात आरोपीने मदत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.
हेही वाचा- मुंबई : अवजड वाहने आणि रस्त्यांच्या कामांमुळे चेंबूरमध्ये वाहतूक कोंडी
शरद विराणी (६९) असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तो नवी दिल्लीतील सरिता विहार येथील रहिवासी आहे. व्यावसायिक संजय संघवी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी २०१६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार संघवी व इतर ४७ साक्षीदारांकडून सोमील एन्टरप्रायजेस प्रा.लि.चे संचालक आरोपी मितेश शहा, संजय शहा व इतर आरोपींनी औषध बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल ९० दिवसांच्या उधारीवर खरेदी केला होता. हा कच्चा माल पुढे आरोपींनी दिल्ली, हरियाणा व इंदौर येथील व्यापाऱ्यांना कोणतीही विक्रीची पावती न देता रोखीने विकला. पण त्याची रक्कम तक्रारदार व साक्षीदारांना न देता अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराला पुढील तारखेचे धनादेश देण्यात आले होते. पण ते वठले नाही. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण प्रकरण ४५ कोटी रुपयांचे असल्यामुळे ते आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी कच्चा माल विकलेल्या ३१ व्यापाऱ्यांचे जबाब आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवले.
याप्रकरणी तपासात दिल्लीतील व्यावसायीक शरद विराणी याने त्यांच्या तीन कंपन्यांमार्फत अपहारातील कच्चा माल ५७ कोटी २३ लाख रुपये किमतीचा माल विक्री पावतीशिवाय खरेदी केला. तसेच आरोपी कंपनीला अंगडियामार्फत रक्कम दिली. त्यामुळे विराणी याने मुख्य आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. तसेच हा कच्चा माल खरेदी करताना कंपनीचे बनावट लेटरहेड व स्टँपचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे हा ५७ कोटी रुपयांचा कच्चा माल विराणीने नेमका कोणाला विकला, याबाबत आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.