लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : दिवाळीला अद्याप खूप वेळ असला तरी पालिकेमध्ये बोनसचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. गणपती किंवा दसऱ्यानंतर विधानसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे त्याआधीच बोनस जाहीर करावा अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना एकूण वार्षिक उपलब्धततेच्या २० टक्के बोनस द्यावा अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघ व दि म्युनिसिपल युनियन यांनी केली आहे.
दिवाळीला अद्याप एक दिड महिना असला तरी पालिकेच्या कामगार संघटनांमध्ये आतापासूनच दिवाळी सानुग्रह अनुदानाची चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी दिवाळी जवळ आली कामगार संघटना बोनसची मागणी करतात. त्यानंतर समन्वय समितीला पालिका प्रशासन चर्चेची वेळ देते. त्यातूनही तोडगा निघाला नाही की बोनसचा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला जातो व मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्ष बोनसची घोषणा करतात. दरवर्षी साधारण अशीच परिस्थिति असते. मात्र यंदा दसऱ्यानंतर विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता काळात राजकीय पक्षांना बोनसबाबत हस्तक्षेप करण्यास मर्यादा येणार आहेत. त्यामुळे आचार संहिता लागण्यापूर्वीच बोनसची रक्कम जाहिर करावी अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.
आणखी वाचा-अंधेरी, जोगेश्वरीत अठरा तास पाणी पुरवठा बंद; गुरुवारी व शुक्रवारी पाणी जपून वापरावे लागणार
मुंबई महापालिकेत एक लाख पेक्षाही जास्त कर्मचारी काम करतात. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी २० टक्के दिवाळी बोनस जाहीर करण्यात यावा, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघ व दि म्युनिसिपल युनियन यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, महापालिका कर्मचारी आणि बेस्ट कर्मचारी, शिक्षक यांना सरसकट २६ हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते. तसेच, आरोग्य सेविकांना ११ हजार रुपये दिवाळी भेट जाहीर करण्यात आली होती. गेल्यावर्षी बोनसपोटी पालिकेच्या तिजोरीवर ३०० कोटींचा भार आला होता. यंदाही कामगार संघटनांनी पालिका कर्मचाऱ्यांना किमान २० टक्के बोनस देण्यात यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ६० हजार कोटींच्या घरात आहे. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती पाहता कर्मचारी संघटनांनी आता पालिकेकडे यंदा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी दिवाळी बोनस म्हणून २० टक्के रक्कम जाहीर करण्यात यावी, अशी मागणी कामगार नेते प्रकाश जाधव आणि रमाकांत बने यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.