चौघांना गुजरातमधून अटक; खंडणीतील पैसा आभासी चलनात गुंतवल्याचे निष्पन्न

मुंबई : एका व्यक्तीचे खासगी चित्रीकरण करून त्याच्याकडे सायबर खंडणी (सेक्सटॉर्शन) मागणाऱ्या टोळीच्या तीन सदस्यांना मलबार हिल पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. विशेष म्हणजे या आरोपींच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासणीत आरोपींनी सायबर खंडणीचा सर्व पैसा आभासी चलनात (क्रीप्टोकरन्सी) गुंतवल्याचे निष्पन्न झाले आहे. ती रक्कम आभासी चलनाच्या माध्यमातून परदेशातील म्होरक्यांना हस्तांतरित करण्यात आली असून अशा प्रकारे या टोळक्याने कोट्यवधींची माया गोळा केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणातील तक्रारदार मलबार हिल या उच्चभ्रू ठिकाणी राहणारे ३२ वर्षीय व्यावसायिक आहेत. ते २८ जूनला घरामध्ये आंघोळ करत असताना त्यांना एक व्हिडीओ कॉल आला होता. त्यांनी तो उचलला असता आरोपींनी त्यांचे चित्रीकरण केले. या प्रकारानंतर तक्रारदार व्यावसायिकाला हे चित्रीकरण पाठवून आरोपींनी खंडणीची मागणी केली. अन्यथा हे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी आरोपींनी दिली होती. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने ३७ हजार रुपये आरोपींना पेटीएमद्वारे पाठवले होते. पण त्यानंतरही आरोपींनी धमकावणे बंद केले नाही. त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या तक्रारदाराने अखेर या प्रकरणी मलबार हिल पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी खंडणी व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता.

आरोपींसोबत झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेऊन पोलिसांनी ते तपासले. हे सर्व व्यवहार गुजरातमध्ये झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर या प्रकरणी गुजरातमधून जसराज दर्जी व सवाईलाल दर्जी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींच्या मोबाइल क्रमांकावर पेटीएमद्वारे आलेली रक्कम त्यांनी गांधी नगर येथील दर्शन शैलेश भाटी याच्या बँक खात्यात जमा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तेथे जाऊन भाटीला ताब्यात घेतले. त्याच्या व्यवहारांची माहिती घेतली असता त्याने पॅक्सफुल या ऑनलाइन आभासी चलन ट्र्रेंडग प्लॅटफॉर्मवरून बीटकॉइन,  इथेरिअम या आभासी चलनात भाटीने ही रक्कम गुंतवल्याचे उघडकीस आले.

परदेशी टोळीचा संबंध?

विशेष म्हणजे आरोपीच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून तो परदेशातील नायजेरियन आरोपींच्या संपर्कात असल्याचेही उघड झाले असून आभासी चलनाच्या माध्यमातून ती रक्कम मुख्य आरोपींपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. अखेर शैलेश भाटी, सवाईलाल दर्जी व जसराज दर्जी यांना मुंबईत आणून त्यांना मलबार हिल पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या प्रकरणामागे परदेशी टोळीचा संबंध आहे. या टोळक्याने देशभरातील अनेक नागरिकांची अशा पद्धतीने फसवणूक केली आहे. त्याच्या माध्यमामधून  कोट्यवधींची खंडणी घेऊन त्या रकमेतून आभासी चलन खरेदी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.