लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या बनावट समाज माध्यम खात्याद्वारे पाचशे रुपये मागितल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले होते. आता मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि न्यायीक अधिकाऱ्यांच्या नावेही फोन किंवा लघुसंदेश करून पैशांची मागणी केली जात असल्याची बाब उघड झाली आहे. उच्च न्यायालय प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. तसेच, अशा प्रकारच्या फोन किंवा संदेशांना बळी न पडण्याचे आणि पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
उच्च न्यायालयाच्या महानिबंधक कार्यालयाने मंगळवारी याबाबतची नोटीस काढून नागरिकांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. उच्च न्यायालय प्रशासनाने आधीच अशा गैरकृत्यांवर स्वतंत्रपणे कारवाई सुरू केली आहे आणि या प्रकरणाची पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे, असेही नोटिशीत प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>राज्यातील ९३ आरोग्य संस्थांसाठी २६०३ कंत्राटी पदे भरणार
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नावाने अज्ञात व्यक्ती फोन करत असल्याचे आणि पैशांची मागणी करत असल्याचा प्रकार उच्च न्यायालय प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. केवळ फोनच नाही, तर व्हॉट्सअॅप संदेश, लघुसंदेश आणि ऑनलाईन लिंक्सद्वारेही न्यायमूर्तीं आणि न्यायीक अधिकाऱ्यांच्या नावे पैसे मागण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. हा सगळा प्रकार गंभीर असून नागरिकांनी असे फोन, व्हॉट्सअॅप संदेश, लघुसंदेश आणि ऑनलाईन लिंक्सद्वारेही केल्या जाणाऱ्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये. तसेच, या अशा प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे उच्च न्यायालय प्रशासनाने याबाबत काढलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
हेही वाचा >>>फेमा कायद्या अंतर्गत ईडीचे कोलकाता, मुंबईत छापे; सुमारे १३ लाखांचे विदेशी चलन जप्त
सावधगिरीची बाब म्हणून आणि कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी हे आवाहन करण्यात आल्याचेही उच्च न्यायालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, अशा प्रकारचा फोन, व्हॉट्सअॅप संदेश, लघुसंदेश किंवा ऑनलाईन लिंक्स आल्यास त्याबाबत पोलिसांना तसेच उच्च न्यायालय प्रशासनाचे प्रमुख अधिकारी राजेंद्र वीरकर यांना rajvirkar@yahoo.com किंवा ९८२१२८१४४५ वर कळवण्याचे आवाहनही नोटिशीद्वारे करण्यात आले आहे.