मुंबई : मुंबईतील गाई, म्हशींचे गोठे, तबेले मुंबईबाहेर स्थलांतरित करण्यास दूध उत्पादकांच्या संघटनेने विरोध केला आहे. पालघरमधील दापचेरी येथे तबेले स्थलांतरित केल्यास मुंबईत दररोज ताजे दूध वितरित करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आरे वसाहतीतच तबेल्यांना जागा द्यावी, उपनगरातील तबेल्यांमधील सुमारे दहा हजार जनावरे आरे दुग्ध वसाहतीत समायोजित करून घ्यावी, अशी मागणी दूध उत्पादक संघटनेने केली आहे. या प्रकरणी पालिका प्रशासनाने आता राज्य सरकारच्या दुग्ध व्यवसाय विकास विभागाला पत्र पाठवले आहे.
मुंबईत उपनगरात विविध ठिकाणी गाई, म्हशींचे तबेले आहेत. हे तबेले मुंबई शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने २००५ मध्ये घेतला होता. पालघर जिल्ह्यातील दापचेरी येथे हे सगळे तबेले स्थलांतरित करण्यात येणार होते. मात्र मुंबई दूध उत्पादक संघटनेने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही संघटनेच्या विरोधात निकाल लागला. त्यामुळे हे तबेले शहराबाहेर नेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र हा निकाल येऊन तीन – चार वर्षे झाली तरी तबेले अजूनही मुंबईतच आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने पालिकेकडे मदत मागितली होती.
तबेले हटवण्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे पालिकेने हे तबेले हटवावे अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार पालिकेने मुंबईतील तबेल्यांचे सर्वेक्षण केले व तबेल्यंना नोटिसा पाठवल्या होत्या. पूर्व आणि पश्चिम उपनगरात २६४ तबेले असून त्यामध्ये सुमारे दहा हजार जनावरे आहेत.
पालिकेने या तबेल्यांना नोटीस पाठवल्यानंतर दूध उत्पादक संघटनेचे (मिल्क प्रोड्युसर असोसिएशन) म्हणणे ऐकून घेण्यासाठी गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाने एक बैठक बोलावली होती. या बैठकीत दूध उत्पादक संघटनेच्या प्रतिनिधींनी आपली बाजू मांडली.
दापचेरी येथील जागा दुधाच्या व्यवसायासाठी योग्य नाही, तेथून दररोज मुंबईत दूध आणणे व विकणे परवडणारे नाही. त्यामुळे आरे वसाहतीतच या तबेल्यांना सामावून घ्यावे, अशी मागणी या संघटनेने केली.
हेही वाचा >>>मुंबई: “२२० वर्ष जुनी एशियाटिक सोसायटी ताब्यात घ्या”, कर्मचाऱ्यांची मोदी सरकारकडे मागणी!
मुंबईकरांना जनांवरांचा त्रास
तबेल्यांमधील शेण, मलमूत्र रेल्वे रुळाजवळ किंवा नदी-नाल्यात सोडले जात असल्याची तक्रार अनेकदा केली जाते. तसेच तबेल्यांमधील जनावरे अन्नाच्या शोधात शहरात फिरत असतात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अंधेरीच्या गोखले पुलावरून गायी नेण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मोकाट फिरणारी जनावरे कचरा कुंड्यांमधील कचरा अस्ताव्यस्त पसरवत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे करण्यात येत आहेत. पालिकेचा संबंधित विभाग अशा जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवतात. मात्र मालकांनी दंड भरून सोडवून नेल्यानंतर पुन्हा ही जनावरे रस्त्यावर दिसतात. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी विविध स्तरांतून होत होती.
गोरेगावात सर्वाधिक तबेले
सर्वाधिक तबेले गोरेगावात मुंबईत एकूण २६३ तबेले असून सर्वाधिक तबेले गोरेगाव परिसरात आहेत. त्यापाठोपाठ जोगेश्वरी, कांदिवली, दहिसर, कुर्ला, विद्याविहार परिसरातही तबेले आहेत. त्यापैकी केवळ आरे वसाहतीतील तबेले हटवण्यात येणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.