मुंबई : कारवाई न करण्यासाठी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने प्रति महिना १० लाख रुपये मागितल्याची लेखी तक्रार अंगडिया व्यावसायिकांच्या मंडळाने अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) दिलीप सावंत यांच्याकडे केली होती. सावंत यांनी याप्रकरणी तक्रार करून स्वत: खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेने एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. पण आरोप करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात अद्याप कोणताही भक्कम पुरावा सापडला नसून त्याच्या सहभागाबाबत तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंगडिया व्यावसायिकांच्या मूळ तक्रारीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात अंगडिया व्यावसायिकांनी बैठक बोलावली होती. त्यात या अधिकाऱ्याकडून १० लाख रुपये मागण्यात आल्याची चर्चा झाली. त्या वेळी या अधिकाऱ्याला रक्कम न देण्याचे या बैठकीत ठरले. त्यानंतर २ डिसेंबर महिन्यात पोफळवाडी परिसरात एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस साध्या वेशात आले व बॅग असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकीत नेण्यास सुरुवात केली, असे अंगडिया व्यावसायिकांच्या मंडळाने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे ५ लाख आहेत त्यांच्याकडे ५० हजार रुपये, ज्यांच्याकडे १० लाख आहेत त्यांच्याकडे एक लाख रुपये मागण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यातील पोलिसांकडूनही २ डिसेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत अंगडिया व्यावसायिकांना ताब्यात घेण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 

या सर्व प्रकारानंतर अंगडिया व्यावसायिकांच्या मंडळाने या वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेतली. त्या वेळी त्याने मला १० लाख रुपये देण्यास सुरुवात करा, मी तुमच्या अडचणी सोडवेन, अशी मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावर अंगडिया व्यावसायिकांनी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर तेवढी रक्कम तर द्यावी लागेल अन्यथा इतर पोलीस ठाण्यांकडूनही कारवाईला सुरुवात करण्यात येईल, अशी धमकीही देण्यात आल्याचे अंगडिया व्यावसायिकांनी तक्रारीत म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

अंगडिया व्यावसायिकांच्या तक्रारीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी याप्रकरणी तात्काळ चौकशीला सुरुवात केली. या चौकशीत अंगडिया व्यावसायिकांचे, आरोपी पोलिसांचे, साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. सावंत यांनी चौकशीअंती याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यात तीन अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) चौकशीनंतर एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम व उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांना याप्रकरणी अटक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगडिया व्यावसायिकांनी ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली होती. त्याविरोधात तपासात अद्याप पुरावे सापडले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.