‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’साठी आरे वसाहतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या कारशेडविरोधातील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मात्र आता पर्यावरणप्रेमींनी आरे वाचविण्यासाठी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनाच साकडे घातले आहे. मेट्रोच्या नावावर आरे वसाहतीमधील जंगल नष्ट करून पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात येत आहे. राष्ट्रपतींनी आरे वाचविण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. आरे संवर्धन गटाने राष्ट्रपतींना ई-मेलच्या माध्यमातून आरे वाचविण्यासाठी साद घातली आहे.

पर्यावरणप्रेमी आणि आदिवासींकडून होणारा विरोध डावलून राज्य सरकार आरे वसाहतीमधील कारशेडचे काम करीत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि राज्य सरकार, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) यांच्यातील वाद चिघळला आहे. एमएमआरसीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून आरे वसाहतीत वृक्षतोड करीत आहे. राज्य सरकारला त्यांचे पाठबळ असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबत आहे. अशा वेळी शक्य तितक्या लवकर कारशेडचे काम बंद करून आरे वाचविणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रपतीना ई-मेलच्या माध्यमातून साकडे घालण्यात आल्याची माहिती आरे संवर्धन गटाचे सदस्य यश मारवाह यांनी दिली.

सोमवारपासून या ई-मेल मोहिम सुरू झाली आहे. https://www.letindiabreathe.in/v2/SaveAareyForest या ई-मेल आयडीवरून ई मेल पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत राष्ट्रपतींना १५० ई-मेल पाठविण्यात आले असून ही मोहीम आठवड्याभर सुरू राहणार असल्याचे मारवाह यांनी सांगितले.