मुंबईतल्या कूपर रुग्णालयातली मॅटर्निटी वॉर्डमध्ये बुरखा घालून गेलेल्या दोन महिलांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप होतो आहे. या प्रकरणाची चर्चा आता मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन महिलांनी हा आरोप केला आहे की सुरक्षा रक्षकांनी त्यांना बुरखा काढून ठेवा असं सांगितलं. या प्रकरणी आता राजकीय वाद रंगला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस आणि एमआयएमने आक्षेप नोंदवला आहे. तर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ही घटना योग्य नाही, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.
जहाँआरा शेख या महिलेने काय आरोप केले आहेत?
रविवारी मी माझ्या नात्यातल्या महिलेला कूपर रुग्णालयातील मॅटर्निटी वॉर्डमध्ये गेले होते. तिथे मला सुरक्षा रक्षकाने सांगितलं की बुरखा उतरवा आणि मग आतमध्ये जा. मी माझा चेहरा झाकला नव्हता, तरीही ते सांगत होते की बुरखा उतरवा. त्यावर मी त्यांना असं का? हा प्रश्न केला. त्यावर बुरखा घालून येतात आणि मुलं चोरी केली जातात असं उत्तर मला देण्यात आलं. मग मी प्रतिप्रश्न केला की फक्त बुरखा घालून येणाऱ्या महिलाच बाळ चोरी करतात का? कूपर रुग्णालयातून जर बाळ चोरीला जात असेल तर तो दोष तुमच्या हलगर्जीपणाचा आहे. बुरखा घालून येणाऱ्या महिलांचा नाही. शिवाय तुम्ही हे चुकीचं सांगत आहात की बुरख्यात येणाऱ्या महिला बाळ चोरी करतात. वाडिया रुग्णालयात साडी नेसणाऱ्या बायकांनीही बाळ पळवल्याची घटना घडली आहे. माझं म्हणणं कुठल्याही साडी किंवा बुरखा याच्याबाबत नाही. मला कुणालाही टार्गेट करायचं नाही. ज्या महिलेला चोरी करायची असेल ती कशीही चोरी करेल. यात सुरक्षेचा हलगर्जीपणा आहे. तिथे महिला सुरक्षा रक्षक का नाही? नातेवाईकांना भेटून महिला येतात तेव्हा त्यांना तपासलं का जात नाही? जर कुणी महिला दोषी आढळली तर तुम्ही कायदेशी कारवाई करा आम्हीही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण अशा पद्धतीने बुरखा उतरवण्यास सांगणं चूक आहे. बुरख्याला टार्गेट करणं बंद केलं पाहिजे. हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने, अधिष्ठातांनी कुणीही हे नियम केले असतील तर ते बदलले पाहिजेत असं जहाँआरा शेख यांनी म्हटलं आहे. तसंच या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायर झाला आहे.
वारिस पठाण काय म्हणाले?
जहाँआरा शेख या आमच्या पक्षाच्या आहेत. वकील आहेत, त्या कूपर रुग्णालयात एका नातेवाईकाला भेटायला गेलेल्या असताना त्यांना बुरखा उतरवण्यास सांगण्यात आलं. बुरखा घालून का जायचं नाही विचारालं गेल्यावर सांगितलं गेलं की बुरख्यामध्ये बाळ चोरी होते. हा कुठल्या पद्धतीचा तिरस्कार आहे. तुम्ही शाळांमध्ये, कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास मनाई करत आहात. आता बुरखाधारी महिलांना रुग्णालयात प्रवेश नाकारला गेला आहे. हा नेमका काय प्रकार आहे? आम्ही तर अशाही बातम्या वाचल्या आहेत की डॉक्टरच्या वेशात येऊन महिलेने बाळ चोरलं, साडी नेसलेल्या महिलेने बाळचोरी केली. साधूच्या वेशात येऊन मुलं पळवली गेली आहेत. मग असा भेदभाव का केला जातो आहे? आमच्या महिला जर बुरखा घालू इच्छित आहेत तर मग तुम्ही त्यांना अडवणारे कोण? आमच्या महिला बुरखा घालून जात आहेत अंतर्वस्त्रं घालून तर जात नाहीत ना? मग तुम्ही आक्षेप घेणारे कोण? आम्हाला संविधानाने हा अधिकार दिला आहे. बुरखा हा आमच्या महिलांचा स्वाभिमान आहे. कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही असं वारिस पठाण यांनी म्हटलं आहे. हे मुस्लिम समुदायाला टार्गेट केलं जातं आहे असाही आरोप वारिस पठाण यांनी केला.
राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण काय म्हणाल्या?
राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. विद्या चव्हाण म्हणाल्या की त्यांचा धर्म त्यांना बुरखा परिधान करण्याची संमती देतो. मग कुठलाही सुरक्षा रक्षक हे कसं काय म्हणू शकतो की बुरखा उतरवून आतमध्ये जा? भारतीय संविधानाने सगळ्यांना आपल्या धर्मानुसार वागण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. मुस्लिम महिलांना अशा पद्धतीने त्रास देणं गैर आहे असं विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.
मुंबईच्या महापौर रितू तावडे काय म्हणाल्या?
जी घटना समोर आली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. हा सगळा प्रश्न माणुसकीचा आहे. कूपर रुग्णालय हे मुंबई महापालिकेचं रुग्णालय आहे. या ठिकाणी असो किंवा इतर कुठल्याही ठिकाणी असो अशी घटना घडणं हे चुकीचंच आहे. रुग्णालयात येणाऱ्या महिलेला मग ती मुस्लिम असो, हिंदू असो किंवा इतर कुठल्याही धर्माची असो धर्माच्या आधारावर तिला प्रवेश नाकारणं ही बाब निंदनीय आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येते आहे आम्ही दोषींवर कारवाई करु असं महापौर रितू तावडेंनी म्हटलं आहे.
