लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या दंतचिकित्सकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्वचारोगतज्ज्ञांच्या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.पात्रता नसतानाही दंतचिकित्सकांकडून सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जात आहे, असा दावा द डायनॅमिक डर्मेटोलॉजिस्ट अँड हेअर ट्रान्सप्लांट असोसिएशनने जनहित याचिकेद्वारे केला आहे. तसेच, संघटनेने ६ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय दंतवैद्यक परिषदेने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान दिले आहे. या नियमांनुसार, देशभरातील मौखिक आणि मॅक्सिलोफेशियल चिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका गुरूवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी, नव्या भारतीय दंतवैद्यक आयोग कायद्यानुसार केंद्रीय दंतवैद्यक आयोग अस्तित्वात आहे की नाही याबाबत न्यायालयाने विचारणा केली. तसेच, त्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. शिवाय, आयोग अस्तित्त्वात असल्यास आयोगाला प्रतिवादी करण्याचे आदेश दिले जातील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
हेही वाचा >>>गस्तीवरील पोलिसाला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल
त्याचवेळी, भारतीय वैद्यक परिषदेने देखील या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिल्याकडे मुख्य न्यायमूर्तींनी लक्ष वेधले. तसेच, भारतीय वैद्यक परिषद ही एक घटनात्मक संस्था असून तिनेही दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे, हे दंचचिकित्सक ही शस्त्रक्रिया करण्यास सक्षम असतील तर त्यात गैर काय, असा प्रश्नही मुख्य न्यायमूर्तींनी केला. त्याचवेळी, आम्ही या विषयातील तज्ज्ञ नाही. त्यामुळे, या विषयावर जास्त भाष्य करणार नसल्याचेही खंडपीठाने म्हटले. तथापि, भारतीय दंतचिकित्सक आयोगाला या प्रकरणी प्रतिवादी करणे आवश्यक असल्याचे नमूद करून प्रकरणाची सुनावणी १९ सप्टेंबर रोजी ठेवली.