मुंबई: देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असला तरी हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी आणखी तीन महिने लागणार आहेत. ऑक्टोबरमध्ये हा प्रकल्प सुरू होणार होता मात्र आता या प्रकल्पाला डिसेंबर अखेरची मुदत देण्यात आली आहे.हा प्रकल्प गेल्यावर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र युद्धामुळे काम रखडल्यामुळे कंत्राटदाराला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यात पुन्हा एकदा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

पालिकेच्या देवनार क्षेपणभूमी येथे सध्या तब्बल २० दशलक्ष मेट्रीक टन जुना कचरा जमा झालेला आहे. देवनार कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले होते. त्या अंतर्गत पालिकेने या ठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे ठरवले होते. गेल्या आठ दहा वर्षांपासून पालिकेचे त्याकरीता प्रयत्न सुरू होते. त्याकरीता निविदा प्रक्रिया राबवून नोव्हेंबर २०२० मध्ये कार्यादेश देण्यात आले होते. त्यानंतर या प्रकल्प स्थापनेसाठी पर्यावरणीय, किनारपट्टी नियमन क्षेत्र परवानगी, एमपीसीबीची परवानगी प्राप्त करण्याची कार्यवाही पार पडली. जून २०२२ पासून या प्रकल्पाच्या आखणी व बांधकामाला सुरुवात झाली असून हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ पासून कार्यान्वित होणार होता. मात्र हा प्रकल्प रखडला आहे.

प्रकल्पाचे वैशिष्ट्य

या प्रकल्पासाठी १०५६ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. प्रकल्पात दररोज ६०० मेट्रीक टन कचऱ्यापासून ८ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पाची क्षमता केवळ ४ मेगावॉट वीजनिर्मिती इतकीच होती. मात्र या ठिकाणी असलेल्या कचऱ्याचा दर्जा पाहून ६०० मेट्रीक टन कचऱ्यापासून सात ते आठ मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकेल असे आढळून आले होते. त्यामुळे पालिकेने या प्रकल्पाची क्षमता वाढवण्याचेही ठरवले. प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे अर्ज केला होता. मात्र केंद्र सरकारने ही परवानगी आधी नाकारली होती.

नंतर पाठपुराव्यानंतर ही परवानगी केंद्र सरकारने दिली. या प्रक्रियेला वेळ लागल्यामुळे प्रकल्प रखडला होता. त्यामुळे कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यातच यावर्षाच्या सुरुवातीला पश्चिम आशियात युद्ध झाल्यामुळे इंधन तुटवड्यामुळे प्रकल्पाला विलंब झाल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रकल्पाला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रकल्पाचे ८० टक्क्यांहून अधिक काम झाले असून डिसेंबर अखेरपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकेल अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रकल्पातून मिळणाऱ्या विजेचे पुढे काय या प्रकल्पातून जी वीज मिळेल ती एकतर वीज वितरण कंपन्यांना विकणे किंवा मुंबई महापालिकेच्याच एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी वापरणे असे दोन पर्याय आता घनकचरा विभागासमोर आहे. वीज वितरण कंपनीला वीज विकायची झाल्यास त्याचा दर वीज नियामक आयोगाकडे अर्ज करून ठरवावा लागणार आहे. महापालिकेच्याच एखाद्या प्रकल्पासाठी वीज वापरण्याचे ठरवल्यास वीजेच्या बिलात बचत होणार आहे.

देवनार क्षेपणभूमी….

देवनार क्षेपणभूमी सन १९२७ पासून कार्यरत असून क्षेपणभूमीचे क्षेत्रफळ सुमारे १२० हेक्टर आहे. देवनार क्षेपणभूमी येथे सद्यस्थितीत सुमारे ६०० मेट्रिक टन इतका नागरी घनकचरा स्वीकारण्यात येतो. तसेच, १८५ लाख मेट्रिक टन इतका जुना साठलेला कचरा आहे. येथील साचलेल्या जुन्या घनकचऱ्यावर बायोमायनिंगचे काम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत जुन्या कचऱयाचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण करून त्यातून माती, पुनर्वापरयोग्य साहित्य व उर्वरित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे कामही सुरू आहे.