मलिकांविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाकडे तक्रार
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाकडे केलेल्या तक्रारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शिफारस राष्ट्रीय आयोगाने केली आहे. तसेच चौकशीच्या नावाखाली समीर वानखेडे अथवा त्यांच्या कुटुंबीयांना त्रास न देण्याबाबतही पोलिसांना आयोगाकडून सांगण्यात आले.
आर्यन खानला अमली पदार्थाप्रकरणी अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यात आरोपांचे द्वंद्व सुरू झाले होते. वानखेडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे येऊन माझ्या व माझ्या कुटुंबावर करण्यात आलेल्या खासगी आरोपांबाबत आपण तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर वानखेडे यांनी २६ ऑक्टोबर २०२१ ला राष्ट्रीय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगाकडे तक्रार केली होती.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून याबाबतचे आदेश शुक्रवारी देण्यात आले. त्याची प्रत राज्यातील मुख्य सचिव, गृह विभागाचे प्रधान सचिव व राज्याच्या पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयांना पाठवण्यात आली असून ७ मार्चला होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. वानखेडे यांच्या आरोपांप्रकरणी तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी स्थापन केलेले विशेष तपास पथक (एसआयटी) स्थगित करण्यात यावे.
वानखेडेंच्या तक्रारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, साहाय्यक पोलीस आयुक्तांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याने या प्रकरणी तपास करू नये, तक्रारदार (वानखेडे) किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा छळ होणार नाही याची काळजी घ्यावी. सात दिवसांत या प्रकरणी अहवाल सादर करावा, अशी शिफारस आयोगाकडून करण्यात आली आहे. तसेच सात दिवसांत त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास आयोगाने सांगितले आहे.