अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी

भाजपच्या २४ जून रोजी झालेल्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत पक्षाने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीची मागणी ठरावाद्वारे केली होती.

चंद्रकांत पाटील यांचे अमित शहा यांना पत्र

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने पत्रात वसुलीचे गंभीर आरोप केले असून त्याबाबत सीबीआयतर्फे सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बुधवारी पत्र पाठवून केली.

भाजपच्या २४ जून रोजी झालेल्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत पक्षाने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीची मागणी ठरावाद्वारे केली होती. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी गृहमंत्री शहा यांना हे पत्र पाठविले आहे, असे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्याबद्दल आरोपी असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याने राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयात एप्रिल महिन्यात एक हस्तलिखित पत्र सादर केले होते. अजित पवार यांच्या वतीने दर्शन घोडावत नावाच्या एका व्यक्तीने आपल्याला कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यास सांगितले, तर अनिल परब यांनी आपल्याला मुंबई महापालिकेच्या पन्नास कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये तसेच सैफी ट्रस्टकडूनही खंडणी वसूल करण्यास सांगितले, असे गंभीर आरोप सचिन वाझे याने या पत्रात केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी होत आहे. त्याचप्रमाणे अजित पवार, अनिल परब आणि दर्शन घोडावत यांच्या विरोधातील वाझेच्या पत्रातील आरोपांची सखोल सीबीआय चौकशी होणे गरजेचे आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deputy chief minister ajit pawar transport minister anil parab police officer sachin waze from badat industrialist mukesh ambani akp

ताज्या बातम्या