मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सायंकाळी केंद्रातील भाजप नेत्यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले. अजित पवार यांची प्रकृती चांगली नसल्याने ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यावरून उगाचच वेगळे अर्थ काढू नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र अजित पवार यांच्या अनुपस्थिती ‘राजकीय आजार’ असल्याची टिप्पणी केली आहे. अजित पवार हे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्याने नाराज असल्याचेही बोलले जात आहे. दैनंदिन कार्यक्रमानुसार पवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ४.३० पर्यंत मंत्रालयात उपस्थित राहणार होते. मात्र तब्येत बरी नसल्याचे कारण देत ते मंत्रालयात आलेच नाहीत. दिवसभर ते ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी होते. सकाळी त्यांनी गाठीभेटी घेतल्याचे समजते. घशाचा संसर्ग झाल्याने त्यांनी दिवसभर विश्रांती घेतली. रात्री पवार यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीचे मंत्री व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक पार पडली. पण अजित पवार बैठकीला उपस्थित नव्हते. हेही वाचा >>>“दादरच्या प्राणी संग्रहालयावर कोणता राजकीय वरदहस्त?” तरणतलावात मगर आढळल्याने मनसेचा सवाल अजित पवार यांच्या अनुपस्थितीची चर्चा असतानाच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे सायंकाळी नवी दिल्लीला रवाना झाले. या भेटीत शिंदे व फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीवारी असल्याचे सांगण्यात आले. पितृपंधरवडा असल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लगेचच होण्याची शक्यता नाही. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे अद्यापही पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली नसल्याने अजितदादा नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे लवकरात लवकर पालकमंत्रीपद सोपवावे, अशी मागणी त्यांनी शिंदे व फडणवीस यांच्याकडे केल्याचे समजते.