मुंबई : मी ओबीसी समाजामुळेच घडलो आहे, असे प्रतिपादन करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  माझ्या नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसींचे प्रमाण सर्वाधिक असून त्यांच्यामुळेच मी निवडून येत आहे, असे स्पष्ट केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नवी दिल्लीत झालेल्या परिषदेस केंद्रीय मंत्री कपिल पाटील, फडणवीस, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करेल, असे सांगून फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती केली. आमच्या सरकारच्या कार्यकाळात ओबीसीसंदर्भात घेतलेले २२ पैकी २१ निर्णय मुख्यमंत्री म्हणून मी घेतले होते. ओबीसींचे राजकीय आरक्षण सत्ता आल्यावर चार महिन्यात परत न आणल्यास  संन्यास घेईन, असे म्हटले होते. मी माझा शब्द पाळला.

पंतप्रधानांची कोणतीही जात नसते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातील आहेत. केंद्र सरकारमधील ४० टक्के मंत्री ओबीसी समाजातील आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय कोटय़ातून आता ओबीसी डॉक्टर तयार होत आहेत. यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. ती पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली, असे फडणवीस यांनी सांगितले.