मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे ७ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले. नाल्यातून गाळ काढण्याची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. भांडुप येथील उषा नगर, उषा नगर कॉम्प्लेक्स, नेहरूनगर नाला (वडाळा), धारावी टी जंक्शन जवळील नालेसफाईच्या कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, माजी आमदार सदा सरवणकर, महानगरपालिकेचे उप आयुक्त देवीदास क्षीरसागर, उप आयुक्त किरण दिघावकर, उप आयुक्त संतोष धोंडे, प्रमुख अभियंता श्रीधर चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाऊस वेळेआधीच सुरू झाला असला तरीही नालेसफाई ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत मोठ्या नाल्याची ८५ टक्के, तर छोट्या नाल्यांची ६५ टक्के सफाई पूर्ण झाली असून अजूनही १५ दिवस हातात आहेत. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच नाल्यातून काढलेल्या गाळाची ४८ तासात क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावावी, असेही निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.

रेल्वेच्या हद्दीत मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने नालेसफाई सुरू आहे. त्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. रेल्वेच्या कल्व्हर्ट खालील कचरा रोबोटच्या मदतीने स्वच्छ करण्यात येत आहे. महापालिकेने दरवर्षीप्रमाणे पाणी साचणारी ठिकाणे निश्चित केली असून ४२२ ठिकाणी पंप बसविण्यात येणार आहेत, तर २ ठिकाणी साठवण टाक्या आणि १० ठिकाणी लघु उदंचन केंद्रे कार्यान्वित करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विक्रोळी येथील दरड प्रवण क्षेत्र अशी ओळख असलेल्या सूर्या नगरला भेट देऊन येथे महानगरपालिकेच्या वतीने संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरवर्षी या ठिकाणी दुर्घटना घडत असल्याने स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवावे, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दादर येथील महानगरपालिकेच्या सफाई कामगारांची वसाहत असलेल्या कासारवाडीला भेट देऊन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, अभ्यासिका आणि अन्य कामांचाही त्यांनी आढावा घेतला.