मुंबई : राज्य सरकारमधील उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याबाबतच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याची खेळी असल्याची चर्चा भाजप आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि केंद्र सरकारची कामगिरी या मुद्द्यांवरच प्रामुख्याने झालेल्या या लोकसभा निवडणुकीत मोदी यांचा करिष्मा चालला नाही. त्याचबरोबर फडणवीस यांना अमान्य असलेले अनेक निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याने आणि सरकारमध्येही काही बाबींमध्ये तडजोडी कराव्या लागत असल्याच्या नाराजीतून फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विधान केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी प्रमुख नेत्याने स्वीकारण्याची गरज होती. फडणवीस यांनी राज्यातील प्रचाराचे नेतृत्व केल्याने अपयशाची जबाबदारी स्वीकारली. वास्तविक ही निवडणूक मोदी यांचा करिष्मा, केंद्र सरकारची १० वर्षातील कामगिरी, २०४७ मध्ये विकसित भारताची संकल्पना, अयोध्येतील राममंदिर, राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करणे आदी मुद्द्यांवर निवडणुकीत प्रचार झाला. महाराष्ट्रात भाजपची कामगिरी चांगली झाली असती, तर त्याचे श्रेय मोदी यांनाच मिळाले असते. मोदी यांच्या नेतृत्वामुळेच व लाटेमुळे २०१४ व १९ च्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले, असेच चित्र निर्माण झाले.

हेही वाचा >>>‘पिपाणी’चा राष्ट्रवादीला फटका; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा

पण अपयशाची जबाबदारी निश्चित करताना मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक नेतृत्वालाच जबाबदार धरले जाते. त्यामुळे फडणवीस यांनी आधीच सरकारमधील जबाबदारीतून मोकळे करण्याचा मनोदय व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यामुळे त्याची सहानुभूती उद्धव ठाकरे व शरद पवार यांना मिळाली. हे दोन्ही पक्ष फोडण्यामध्ये फडणवीस यांची सक्रिय भूमिका असली तरी, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच या घडामोडी झाल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. लोकसभा उमेदवार निश्चितीमध्येही फडणवीस व प्रदेश सुकाणू समितीच्या शिफारशी डावलून पक्षश्रेष्ठींकडून अनेकांना उमेदवारी दिली गेली. जागावाटपामध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हट्ट पक्षश्रेष्ठींकडून मान्य केला गेला. राज्य सरकारमध्ये काम करतानाही शिंदे-पवार यांचा काही मुद्द्यांवरील आग्रह मान्य करावा लागतो व निर्णय घ्यावे लागतात. विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारला पुढील दोन महिन्यांमध्ये वेगाने काम करावे लागणार आहे. तीन पायांचे सरकार आणि प्रत्येकाची वेगवेगळी मते व रस, यात काम करताना अडचणी येतात. सरकारच्या बऱ्यावाईट निर्णयांचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतील. त्यामुळे सरकारमध्ये राहून काम करण्यापेक्षा पक्षपातळीवर काम करून भाजपची कामगिरी कशी चांगली राहील, याकडे लक्ष देण्याचे फडणवीस यांनी ठरविल्याचे समजते.

फडणवीस यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला, तर राज्यातील पराभवासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुंबईसाठी अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनाही नैतिक दृष्टीने जबाबदार धरावे लागेल. पण फडणवीस यांच्यासह बावनकुळे, शेलार व अन्य नेत्यांनीही मेहनत घेतल्याने फडणवीस यांना सरकारबाहेर पडण्याची परवानगी पक्षश्रेष्ठी देणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

सरकारमधील जबाबदारी कोणाची…

शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित झाल्यावरही फडणवीस यांनी सरकार बाहेर राहण्याचा मनोदय व्यक्त केला होता. पण सरकार सुरळीत चालविण्यासाठी फडणवीस यांचा त्यात सहभाग असावा, अशी सूचना पक्षश्रेष्ठींनी केली व त्यांनी नाईलाजाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. आता वेगाने काम करण्याची अवघड वेळ असताना फडणवीस यांच्याऐवजी दुसऱ्या कोणत्या भाजप नेत्याचा सरकारमध्ये समावेश करायचा, याची अडचण पक्षनेतृत्वापुढे असेल. शिंदे-पवार यांच्याकडे सरकारची सर्व सूत्रे भाजप पक्षश्रेष्ठी कधीही ठेवणार नाहीत. फडणवीस वगळून सरकार चालविताना पंचाईत होईल आणि त्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे फडणवीस यांनी सरकारबाहेर पडू नये, अशी सूचना पक्षश्रेष्ठींकडून करण्यात येईल, असे राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना वाटत आहे.