महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारला आज (२७ नोव्हेंबर) २ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भावना व्यक्त केलीय. यात त्यांनी राज्यातील विकास कामांची यादीच वाचून दाखवली आहे. तसेच राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद मानलेत. कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “कुठल्याही सरकारची कामगिरी केवळ एका व्यक्तीवर अवलंबून नसते. एक चांगला संघ असेल तर कर्णधाराला बळ मिळतं आणि या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ही ताकद मला माझे सहकारी, प्रशासन, सर्वसामान्य जनता यांच्याकडून वेळोवेळी मिळाली. आम्ही महाविकास आघाडी म्हणून गेल्या दोन वर्षांच्या काळात जे काम केलं त्यामुळं राज्याची कामगिरी विविध संकटे येऊनही चांगली राहिली आणि याचं श्रेय माझे सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी- कर्मचारी यांचं आहे. राज्यातल्या जनतेनंसुद्धा आम्हाला आपलं मानलं; ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मी समजतो.”

“२० हजार कोटींपेक्षा जास्त कर्जमाफी करून दाखवली”

“सत्तेवर आल्यानंतर चार  महिन्यांतच करोनाच्या मोठय़ा आव्हानाला सामोरं जावं लागलं हे आपल्याला माहीतच आहे; पण तत्पूर्वी आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मानेवरचं कर्जाचं ओझं काही प्रमाणात का होईना उतरवणारी ‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ आणली आणि २० हजार कोटींपेक्षा जास्त कर्जमाफी करून दाखवली. मी हे एवढय़ाचसाठी सांगितलं कारण अगदी सत्तेवर आल्यापासून आमचा केंद्रिबदू सर्वसामान्य लोक, शेतकरी, कामगार होता आणि पुढेही राहील,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“संकटाचं संधीत रूपांतर केलं”

“अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आल्या, पण आम्ही विचलित झालो नाही. बहुतांश कालावधी तर करोनाचा मुकाबला करण्यात गेला आणि आजही या विषाणूने आपलं रूप बदलवून परत एकदा जगासमोर आव्हान उभं केलं आहे. पण पहिल्या दोन्ही लाटांमध्ये आम्ही अतिशय नियोजनबद्ध पावलं टाकली, जसं की देशात पहिल्यांदाच तज्ज्ञ डॉक्टर्सचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय टास्क फोर्स निर्माण केले. लहान मुलांमधील संसर्गाची भीती लक्षात घेऊन बालकांसाठी वेगळा टास्क फोर्स उभा केला. ही काही उदाहरणं आहेत. पण एकूणच आरोग्य क्षेत्रातील सर्व संबंधित तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत आपण पुढे जात राहिलो. संकटाचं संधीत रूपांतर केलं,” असंही मुख्यमंत्री ठाकरेंनी नमूद केलं.

“मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा वाढविल्या”

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज तुलना केली तर, दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसेच साधनसुविधा आणि आत्ताच्या सुविधा यात मोठा फरक आहे. करोनाच्या या लढय़ात आपण या सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढविल्या आहेतच; शिवाय त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत, त्यामुळे भविष्यातदेखील विविध रोग आणि साथींचा मुकाबला आपण सक्षमपणे करू शकणार आहोत. प्राणवायू निर्मिती असो, मोठय़ा प्रमाणावर लसीकरण असो, मोठमोठय़ा जम्बो सेंटर्सची उभारणी किंवा यात तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नावीन्यपूर्णता आणणं असो, राज्यानं देशात निश्चितपणे उदाहरण निर्माण केलं असा मला विश्वास आहे.”

“नवनवीन योजना नुसत्या आणल्याच नाहीत तर राबवून दाखवल्या”

“मुख्य म्हणजे हे सर्व सुरू असताना शासन आणि प्रशासनात कुठेही नकारात्मकता नव्हती. उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, सर्वसामान्यांसाठी घरं, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा, पर्यावरण, पर्यटन याकडे लक्ष होतं. प्रत्येक विभागाने या संपूर्ण काळात सर्वसामान्यांना प्रत्यक्ष लाभ कसा मिळेल यासाठी भरपूर मेहनत घेतली. नवनवीन योजना नुसत्या आणल्याच नाहीत तर राबवून दाखवल्या,” असंही त्यांनी सांगितलं.

“रोजगाराच्या संधी निर्माण करताना सुविधाही वाढवून दिल्या”

“इलेक्ट्रिक वाहन धोरणाचं उदाहरण निश्चितपणे द्यायला आवडेल. हे पर्यावरणपूरक आणि प्रगतिशील धोरण आणून महाराष्ट्रानं वाहन उद्योग असो किंवा वाहनं वापरणारे नागरिक असो यांच्यामध्ये एक नवा विश्वास जागविला. या संकटकाळात पर्यटन व्यवसायात महाराष्ट्रानं जितक्या विविध कल्पना आणल्या असतील तितक्या क्वचितच इतर राज्यांनी आणल्या असतील. एकीकडं रोजगाराच्या संधी निर्माण केल्या तर दुसरीकडे सुविधा वाढवून या क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन दिलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

“गेल्या वर्षी सुमारे दोन लाख तरुणांना रोजगार दिला”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “पर्यटनास उद्योगाचा दर्जा दिला, परवान्यांची अनावश्यक संख्या कमी केली. करोना असूनही विविध उपक्रम राबवून गेल्या वर्षी सुमारे दोन लाख तरुणांना रोजगार दिला. तरुणांना वेगवेगळय़ा कौशल्यांत पारंगत करून त्यांना रोजगार मिळेल असं पाहिलं. हिंदूुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गही आम्ही लवकरच खुला करणार आहोत. राज्यात विविध शहरांना हवाई सेवेनं जोडण्याचे नियोजन आहे. रस्ते, मेट्रो मार्ग यांचं इतकं भक्कम आणि दर्जेदार जाळं राज्यात असणार आहे की गतिमान महाराष्ट्राची नवीन ओळख त्यातून निर्माण होईल.”

हेही वाचा : महाआघाडी’ ची दोन वर्षे : जनतेनं आम्हाला आपलं मानलं..

“देशाचं ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईसारख्या महानगरात सागरी मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर िलक आणि इतर मार्ग यामुळे मुंबई, ठाणे तसेच संपूर्ण महानगराच्या दळणवळण इतिहासात क्रांती आल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व करताना वनांचा विकास, वन्यजीवांना संरक्षण, समृद्ध पर्यावरणाचा विचार यांच्याशी कुठंही तडजोड केली नाही. वन्यजीवांचादेखील विचार केला, त्यांच्या भ्रमण आणि अधिवासासाठी ११ नवीन राखीव संवर्धन क्षेत्रं केली आहेत,” असं ठाकरे म्हणाले.