मुंबई : पहिल्याच पावसात मुंबई पाण्याखाली गेल्यानंतर आता पूरस्थितीची कारणमीमांसा होऊ लागली आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणांवर हाती घेतलेली रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची, तसेच मेट्रोची कामे, अपूर्ण असलेली नालेसफाई, काँक्रीटीकरणामुळे जमिनीत पाणी न झिरपणे अशा विविध कारणांमुळे मुंबईत दरवर्षी पाणी साचण्याचा यंत्रणेत अडथळा होऊ लागला आहे. शहराचा पायाभूत विकासच शहराच्या मुळावर उठला असल्याचेच चित्र आहे.
मुंबईत दरवर्षी जूनच्या दहा तारखेनंतरच पावसाला सुरूवात होते. त्यामुळे पालिकेच्या सर्व पावसाळापूर्व कामांना ३१ मेपर्यंतची मुदत असते. त्यादृष्टीनेच नियोजन केले जाते. मात्र यंदा पावसाने पालिकेच्या या नियोजनावरच पाणी फेरले. पाऊस एक आठवडा आधीच आल्यामुळे पालिकेची यंत्रणा तयारीत नव्हती त्याचाही फटका सोमवारी मुंबईकरांना बसला. मुंबईत एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मेची मुदत देण्यात आली होती. मात्र कामे पूर्ण होण्याआधीच पाऊस पडला. नवीन रस्त्यांच्या कडेला तयार करण्यात आलेल्या पर्जन्य जलवाहिन्या नीट काम करत आहेत की नाहीत हे पाहण्याआधीच पावसाने शहराला झोडपले. त्यामुळे रस्त्यांची कामेही पाणी साचण्यास कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
खड्डे मुक्तीसाठी सगळ्याच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतलेला असला तरी काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरतच नसल्यामुळे ते रस्त्यावरच साठून राहते, असे मत पॉटहोल वॉरियरचे सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अन्सारी यांनी व्यक्त केले आहे.
एकाचवेळी रस्त्यांची कामे सुरू असून मेट्रोचीही कामे सुरू आहेत. त्यातच भूमिगत मार्गामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो की काय असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहेत. मेट्रो ३ च्या वरळी येथील स्थानकात पाणी शिरल्यामुळे नवीनच प्रश्न उपस्थित झाला आहे. बांधकामाच्या वेळी मुसळधार पावसाचा विचार करून योग्य जलनिकासी व्यवस्था केली गेली असती, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पावसाचे पाणी थेट स्थानकात शिरणे हे जलप्रतिबंधक उपाय अपुरे असल्याचे निदर्शक आहे. उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांतच सेवा ठप्प होणे ही देखभाल व नियोजनातील गंभीर त्रुटी आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईतील पावसाळापूर्व नालेसफाईची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. पावसाळापूर्व नालेसफाई ही जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतात. आतापर्यंत मोठ्या नाल्याची ८५ टक्के तर छोट्या नाल्यांची ६५ टक्केपर्यंत सफाई पूर्ण झाली असून अजूनही १५ दिवस हातात असल्याचा पालिका प्रशासनाचा समज होता. नालेसफाई १०० टक्के झाली असल्याचा दावा केल्यानंतरही मुंबई पाण्याखाली जाते. तर यंदा ही कामे आधीच अपूर्ण आहेत. त्यामुळेही पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नसल्याचे बोलले जात आहे.