शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. वाघाचे फोटो काढले म्हणून कुणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी निधड्या छातीनं आव्हानांचा सामना करावा लागतो. नुसती फोटोग्राफी करून वाघ होता येत नाही, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी नेमका कुठला सामना केला, कोणत्या आंदोलनात होते, कुठल्या संघर्षात होते, असा सवालही त्यांनी फडणवीस यांनी विचारला आहे. तसेच करोना काळाच्या संघर्षात मैदानात कोण होतं? उद्धव ठाकरे केवळ फेसबूक लाईव्ह वर होते, आम्ही मैदानात अलाईव्ह होतो, असंही त्यांनी म्हटलं. कालच्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे भोळे होते. पण मी भोळा नाही धूर्त आहे.

यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हो वाघ भोळाच असतो. बाळासाहेब ठाकरे भोळे होते. पण धूर्त कोण असतं, हे तुम्हाला माहीत आहे. मी त्या प्राण्याचं नाव घेणार नाही. कारण त्यांनी पातळी सोडली म्हणून मला पातळी सोडायची नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

हो, बाळासाहेब ठाकरे वाघ होतेच पण आता देशात केवळ एकच वाघ आहे. आणि त्या वाघाचं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहे. शिवसेनेच्या म्हणण्यानुसार मंदिरातील घंटा वाजणारा हिंदू नको, तर आतंकवाद्याला बडवणारा हिंदू पाहिजे. हो आतंकवाद्याला बडणारा हिंदू नरेंद्र मोदी आहे. जवानावर हल्ला झाल्यानंतर सीमेपार जाऊन सर्जीकल स्टाईल करणारा हिंदू नरेंद्र मोदी आहे. त्यांनी सीमेमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारलं.

देवेंद्र फडणवीसाने पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, माझ्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकत नाही. तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली आणल्याशिवाय मी राहणार नाही. आणि लक्षात ठेवा, बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोत म्हणायचे. त्याच मैद्याच्या पोत्यावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात. त्यामुळे जेवढं वजन वर आहे, त्यापेक्षा दुप्पट वजन खाली आहे, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.