प्रत्येक मंत्र्याला पाच निर्णय कळविण्याचे फर्मान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारची पुढील महिन्यात द्विवर्षपूर्ती होत असून त्यानिमित्ताने सरकारच्या कामगिरीचे जोरदार प्रदर्शन करण्यासाठी ‘विशेष प्रसिद्धी मोहीम’ राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक मंत्र्याने आपल्या खात्याचे जास्तीत जास्त पाच निर्णय किंवा नवीन योजना कळविण्याचे फर्मान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना काढले आहे. आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर डोळा ठेवून उद्घाटने, भूमिपूजने व निर्णयांचा धडाका लावण्यास सुरुवातही झाली असून पुढील महिन्यात त्यास आणखी गती दिली जाईल.

प्रथम वर्षपूर्तीच्या वेळी दुष्काळी परिस्थिती असल्याने ती फारशा धडाक्यात साजरी करण्यात आली नव्हती. प्रसिद्धीमाध्यमांमध्ये जाहिराती, मुख्यमंत्र्यांच्या विशेष मुलाखती आणि प्रत्येक खात्याच्या महत्त्वाच्या निर्णयांच्या पुस्तिका अशा स्वरूपात सरकारची कामगिरी मांडण्यात आली होती. यंदा मात्र पावसाने चांगली साथ दिली आहे. त्यामुळे द्विवर्षपूर्ती धडाक्यात साजरी करून त्यानिमित्ताने विशेष प्रसिद्धी मोहीम राबविण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे.

‘परिणामकारक योजनांची माहिती द्या’

द्विवर्षपूर्तीनिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना पत्र पाठविले असून त्यात संबंधित खात्याने घेतलेल्या जास्तीत जास्त पाच निर्णय व नव्या योजनांचा तपशील देण्याची सूचना केली आहे. अनेक मंत्री खात्याचे वर्षभरातील शासन निर्णय, सर्व योजना व भाराभर माहिती पाठवितात आणि त्याचा त्रास मुख्यमंत्री कार्यालयास होतो. त्यामुळे पाचपेक्षा अधिक सहावा निर्णय पाठवू नका आणि फापट पसारा नको. खात्याचे निर्णय किंवा योजना सर्वसामान्यांच्या दृष्टीने लाभदायक व मोठा परिणाम करणाऱ्या असाव्यात, अशा  सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis
First published on: 19-09-2016 at 02:15 IST