“अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग”; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप, पत्रकार परिषदेत दिले पुरावे!

देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक यांच्यावर खळबळजनक आरोप केले असून त्याचे पुरावे देखील सादर केले आहेत.

devendra fadnavis on nawab malik underworld connection (2)
देवेंद्र फडणवीसांचे नवाब मलिक यांच्यावर खळबळजनक आरोप

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीका सुरू केली आहे. या टीकेच्या अनुषंगाने त्यांनी भाजपावर देखील टीकास्त्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून देखील नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट अंडरवर्ल्डशी नवाब मलिक यांचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले असून ते संबंधित तपास यंत्रणांकडे देखील देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

नवाब मलिक यांचा सहभाग असलेल्या किमान ५ व्यवहारांमध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. २००५ पासून दोन वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच नवाब मलिक राज्यात अल्पसंख्याक मंत्री होईपर्यंत झालेल्या व्यवहारांचा यामध्ये समावेश असल्याचं फडणवीस म्हणाले. आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून खरेदी!

नवाब मलिक यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शहावली खान या गुन्हेगारासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. मुंबईच्या एलबीएस रोडवरील २.८ एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही साडेतीन कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, सलीम पटेल हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा ड्रायव्हर, फ्रंट मॅन आहे, तो देखील या जमिनीचा पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर असल्याचं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis PC : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली – फडणवीसांचा बॉम्ब

किमान ५ व्यवहारांची माहिती!

दरम्यान, अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या किमान ५ व्यवहारांची माहिती आपल्याकडे असून त्याची कागदपत्र संबंधित तपास यंत्रणांना आपण देणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. यातल्या ४ व्यवहारांमध्ये तर १०० टक्के अंडरवर्ल्डचा सहभाग असल्याची आपल्याला खात्री असल्याचं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना कागदपत्र पाठवणार

दरम्यान, संबंधित तपास यंत्रणांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही सर्व कागदपत्र पाठवणार असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यांचे मंत्री काय कांड करतायत, हे त्यांनाही कळायला हवं, असा टोला देखील फडणवीसांनी यावेळी लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnavis accuse nawab malik on underworld connection shahawali khan pmw

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा