मुंबई : मुंबईसह अन्य महापालिकांमधील सत्तावाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी दुपारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मुंबईत शिवसेनेला अडीच वर्षे महापौरपद, उपमहापौर, स्थायी, सुधार, बेस्ट आदींपैकी काही समित्यांची अध्यक्षपदे मिळावीत, अशी शिंदे गटाची अपेक्षा आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आदी महापालिकांबाबत एकत्रित निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

फडणवीस दावोसला गेल्याने मुंबईसह अन्य महापालिकांमधील भाजप-शिवसेना (शिंदे) सत्तावाटप झालेले नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजप व शिंदे गटातील नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणीही करण्यात आलेली नाही. पण आता फडणवीस मुंबईत परतल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला ८९ जागा मिळाल्या असून बहुमताचा ११४ चा आकडा गाठण्यासाठी शिंदे यांची मदत लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटाला सत्तेमध्ये मोठा वाटा हवा आहे. मुंबई महापालिकेत सत्तेमध्ये किती वाटा मिळतो, त्या धर्तीवर शिंदे गटाकडून ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर या महापालिकांमधील सत्तेचा वाटा भाजपला किती द्यावा, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे फडणवीस-शिंदे बैठकीत मुंबई महापालिकेतील सत्तावाटपाचा निर्णय काय होतो, त्यानुसार अन्य महापालिकांतील सत्तेची समीकरणे जुळविली जाणार आहेत.

पुढील आठवड्यात गटनोंदणी

मुंबईत भाजप-शिवसेना नगरसेवकांच्या गटांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी झालेली नाही. यासंदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यात चर्चा झाली आहे.

सत्तावाटपाचे सूत्र ठरल्यावर येत्या मंगळवारी-बुधवारी गटनोंदणी होईल, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. महापालिकेकडून महापौरपदासाठीच्या निवडणुकीची घोषणा मंगळवार किंवा बुधवारी होण्याची शक्यता असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक होईल. त्या दृष्टीने आम्ही तयारी करीत असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने नमूद केले.

● शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाल्याने शिंदे गटाला अडीच वर्षे मुंबईत महापौरपद हवे आहे. भाजपच्या ८९ जागांच्या तुलनेत शिंदे गटाच्या २९ जागा खूपच कमी असल्या तरी बहुमतासाठी शिवसेनेची गरज असल्याने भाजपने अडीच वर्षे महापौरपदही द्यावे, असे शिंदे गटाला वाटत आहे.

● भाजपने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून ते शिंदेंना दिले, तर महापौरपदही द्यायला हरकत नाही. त्यामुळे भाजपकडून सत्तावाटपाचा काय प्रस्ताव येतो, हे पाहून शिंदे गटाकडून सत्तापदांची मागणी केली जाणार असल्याचे शिंदे गटातील ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

● मीरा-भाईंदर येथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही समीकरणे जुळविली आहेत, तर कल्याण-डोंबिवलीतही खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळे मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिला आहे.

● भाजपकडून मुंबईत शिवसेनेला ज्या पद्धतीने सत्तेत सहभागी करून घेतले जाईल, त्या धर्तीवर अन्य ठिकाणी शिंदे यांच्याकडून भूमिका घेतली जाणार आहे. त्यामुळे फडणवीस-शिंदे यांच्यातील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.