मुंबई : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नाही. तरुणांनी सातत्याने नवी कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. जगातील २८ हून अधिक देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. राज्यातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
एआय, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालणे आवश्यक आहे. उद्योजकांना कुशल मनुष्यबळाची गरज आणि तरुणांना रोजगाराची आवश्यकता, या दोन्ही बाबींना जोडणारा दुवा म्हणून रोजगार मेळावे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण व नाशिक विभागातील तरुणांना रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देशातील सुमारे ६५ टक्के लोकसंख्या कार्यक्षम युवाशक्ती आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मानव संसाधनाचा प्रभावी विकास करावा लागेल. गरिबी व बेरोजगारीमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकासाला रोजगाराशी जोडणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सहीदा परमाणिक आणि कांती शंभू चव्हाण या दोघांना एका खासगी कंपनीच्या बेलापूर व कुर्ला येथील कार्यालयांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पणन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.
