मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरसाठी ‘एम्स’च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्थे’ची घोषणा करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावचीही काळजी घेण्यात आली आहे.. शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील दरेगाव या मूळ गावी निसर्गोपचार केंद्राची घोषणा करण्यात आली. त्याचप्रमाणे शिंदेंच्या गावाजवळील वासोटा किल्ल्यासाठी रोपवेला मंजुरी देण्यात आली.

ताणतणाव, जीवनशैलीजन्य आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांसाठी सातारा जिल्ह्यात दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे दरेगाव सातारा जिल्ह्यात वसले आहे. २०२२ साली शिवसेनेत फूट पडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरेगाव चर्चेत आले. त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये आधी मुख्यमंत्रीपदावरून तसेच मंत्रिमंडळ शपथविधीवरून चालू असलेल्या धामधुमीच्या काळात एकनाथ शिंदे दरेगाव खूपच चर्चेत आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणताही निर्णय पटला नाही तर उपमुख्यमंत्री दरेगावाला भेट देत असल्याची चर्चा आहे.

तेथील पावसाळ्यातील शेती करतानाची चित्रफीत, छायाचित्रांनाही चांगली प्रसिद्धी मिळाली. सह्याद्रीच्या कुशीत कोयना नदीच्या तिरावर वसलेले दरे हे निसर्गरम्य गाव आहे. याच निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दरेगावात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात करताना शिंदे यांची विशेष काळजी घेतली. याची माहिती पत्रकार परिषदेत देताना एकनाथ शिंदे यांनी आवर्जुन या निसर्गोेपचार केंद्राचा उल्लेख केला.

वासोटा किल्ल्यासाठी रोपवे सुविधा

दरेगावच्या निसर्गोपचार केंद्राविषयी माहिताी देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘लाडक्या भावाचीही काळजी’ घेतल्याची टिपणी केली. सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतारांगांमध्ये वसलेला वासोटा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि रणनीतीचे प्रतीक आहे. पर्यटकांच्या सुरक्षित, सुलभ व पर्यावरणपूरक प्रवेशाकरिता मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. सध्या या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोयना अभयारण्यातून ३ ते ४ तासांचा ट्रेक करावा लागतो. रोपवेमुळे हे अंतर कमी होणार आहे.

नागपूरमध्ये ‘महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था’

सार्वजनिक आरोग्याच्या सर्वंकष उन्नतीसाठी एम्स व आयआयएमच्या धर्तीवर गुणवत्तेच्या प्रशिक्षण व संशोधनासाठी नागपूर येथे भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था’ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.